सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणार
By Admin | Updated: July 1, 2014 23:58 IST2014-07-01T23:54:10+5:302014-07-01T23:58:02+5:30
जितेंद्र आव्हाड : आयुर्वेदिक महाविद्यालयाला भेट

सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणार
सावंतवाडी : सिंधुदुर्ग हा मोठा जिल्हा आहे. या ठिकाणी आरोग्याची सुविधा निर्माण होण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये मेडिकल कॉलेज सुरू व्हावे. त्यासाठी शासन सर्व मदत करेल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले. त्यांनी मंगळवारी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, अबिद नाईक, माजी आमदार शिवराम दळवी, विकास सावंत आदी उपस्थित होते.
मंत्री आव्हाड यांचा संस्था अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर अॅड. नार्वेकर यांनी महाविद्यालयाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच शासनाकडून उद्भवणाऱ्या समस्या मंत्री आव्हाड यांच्याकडे मांडल्या. यात शिक्षकांचा समावेश तसेच परवानग्या आदी विषयी प्रश्न मांडण्यात आले.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, या सर्व प्रश्नांवर आपण गुरुवारी बैठकीचे आयोजन केले असून हे प्रश्न तातडीने सोडविले जातील, असे आश्वासन दिले. गेली ३५ वर्षे प्रलंबित असलेला बीएमएस डॉक्टर होमियोपॅथीकची प्रॅक्टीस करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे वैद्यकीय शिक्षणाबाबतचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुसज्ज असे मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी राज्य शासनाची जागा उपलब्ध आहे. तुम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवा, मी त्यांचा पाठपुरावा करीन, असे सांगून जिल्ह्यात एक रुग्णालय उभे करूया, असे आश्वासन त्यांनी दिले. यापुढे महाविद्यालयात जाऊन शिक्षकासह विद्यार्थ्यांनाही भेटून त्यांच्या समस्या सोडविल्या जातील, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला नगरसेवक उमाकांत वारंग, रमेश पै, रमेश बोंद्रे, सुहास नायडू, दीपक तुपकर, गुरू मठकर, सचिन वालावलकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)