पेन्शनबाबतच्या तक्रारी पाठवा
By Admin | Updated: November 9, 2014 23:35 IST2014-11-09T21:23:49+5:302014-11-09T23:35:06+5:30
एम. डी. जोशी : कुडाळ येथील मेळाव्यात आवाहन

पेन्शनबाबतच्या तक्रारी पाठवा
कुडाळ : पेन्शनरांच्या पश्चात घटस्फोटीत आणि विधवा मुली, अविवाहीत मुली, शारीरिकदृष्ट्या अपंग मुलींना मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनबाबत तक्रारी असल्यास संघटनेकडे पाठवाव्यात, असे आवाहन आॅल इंडिया सेंट्रल गव्हर्मेंट पेन्शनर्स असोशिएशन सिंधुदुर्गचे सचिव एम. डी. जोशी यांनी पेन्शनर्स असोसिएशनच्या मेळाव्यात बोलताना केले.
येथील बॅ. नाथ पै विद्यालयात पंचक्रोशी सेंट्रल गर्व्हमेंट पेन्शनर्स फॅमिली पेन्शनदारांचा मेळावा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आर. एस. मेथर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मेळाव्याच्या सुरुवातीला गुरुनाथ कुलकर्णी यांचे गीत झाले. सातव्या वेतन आयोगाची घोषणा आणि त्यांचे पेन्शनर फॅमिली पेन्शनरना मिळणारे अपेक्षित फायदे व ८0 व्या वर्षी व त्यानंतर मिळणारी वाढीव पेन्शन, त्यासाठी पेन्शनर, फॅमिली पेन्शनरनी करावयाची पूर्तता याबाबत माहिती जोशी यांनी दिली. महिला सबलीकरणाच्या दृष्टीकोनातून पेन्शनर, फॅमिली पेन्शनरच्या पश्चात घटस्फोटीत आणि विधवा मुली, अविवाहीत मुली व शारीरिकदृष्ट्या अपंग मुलामुलींना मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनबाबत जोशी यांनी माहिती देताना अशाप्रकारची अनेक प्रकरणे शासन दरबारी पडून असली, तर त्यांचा निपटारा करण्यासाठी संघटना प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून मूळ पेन्शन द्यावी, वैद्यकीय सुविधा सर्व पेन्शनर्सना वर्गवारी न करता समान द्यावी, मेडिकल भत्ता दोन हजार रुपये करावा, एडिशनल पेन्शन ६५ वर्षांपासून नव्वदव्या वर्षी १०० टक्के द्यावी, बीएसएनएल पेन्शनर्सना समान न्याय द्यावा, मूळ पेन्शन ५० टक्क्यांऐवजी ६७ टक्के द्यावी अशा अनेक मागण्या मेळाव्यात करण्यात आल्या.
मालवणमधील संघटनेचे कार्यालय व पेन्शनर्ससाठी गेस्ट हाऊस उभारण्याच्या योजनेबाबत आर. एस. मेतर यांनी माहिती दिली. हा संपर्क पूर्ण करण्यासाठी सर्वांनी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यात द. म. साटेलकर, व्ही. आर. दळवी, एस. एस. धुरी या ८० वर्षांवरील पेन्शनरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात
आला. (प्रतिनिधी)