बचतगटांना कर्ज नाही
By Admin | Updated: September 10, 2015 00:40 IST2015-09-10T00:39:18+5:302015-09-10T00:40:02+5:30
बँकांचा निर्णय : सुनील रेडकर यांची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सभेत माहिती

बचतगटांना कर्ज नाही
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात स्वयंसहाय्यता बचतगटांना कर्जस्वरुपात १३ कोटी २० लाख रुपये देण्याचे उद्दीष्ट्य जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला असून यापैकी केवळ ९८ लाख रुपये बँकेमार्फत मंजूर झाले आहेत. जिल्ह्यातील बँका बचतगटांना कर्ज देण्यास इच्छुक नसल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील रेडकर यांनी सांगत तब्बल २३५ कर्ज प्रस्ताव बँकांकडे पडून असल्याची माहिती दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळाची त्रैमासिक सभा बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य तथा कणकवली सभापती आस्था सर्पे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तसेच समिती सचिव सुनील रेडकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत कणकवली येथे मार्केट यार्डची इमारत मंजूर झाली. इमारतीच्या कामालाही सुरुवात झाली. मात्र सद्यस्थितीत या हे काम रखडले असल्याचा मुद्दा सदस्य आस्था सर्पे यांनी उपस्थित केला. यावर चर्चा करत जोपर्यंत मार्केट यार्डचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठेवीदाराचे कोणतेही बिल अदा करण्यात येवू नये असे आदेश अध्यक्ष संदेश सावंत यांनी बांधकाम विभागाला दिले. हजारो बचतगटांपैकी ४० बचतगट हे सक्षम व सर्वोत्कृष्ट उत्पादन घेणारे असल्याची माहिती सभेत देण्यात आली. त्यांनी केलेल्या कामकाजाबाबत इतर गटांना प्रेरणा मिळेल हा उद्देश समोर ठेवून त्या गटांना भेटी देणार असल्याचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी सभागृहात स्पष्ट केले. जिल्ह्यातील कित्येक बेघरांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध नाही. तसेच जमीन खरेदीसाठी शाससनाकडून देण्यात येणारे २० हजार रुपये पुरेसे नाहीत. कारण बाजारभाव बघता जमिनीच्या किंमती या भरमसाठ वाढलेल्या आहेत. त्यामुळे बेघरांना जमीन खरेदीसाठी बाजारभावाप्रमाणे रक्कम देण्यात यावी असा मुद्दा आस्था सर्पे यांनी मांडला. यावर एकमत होऊन तसा ठराव घेण्यात आला. तसेच इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी देण्यात येणारा निधी तुटपुंजा असून त्यातही वाढ करून मिळावी असा ठरावही घेण्यात आला. रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत यावर्षी १२०० घरांचे उद्दीष्ट्य असून त्यापैकी ४४५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यातील ३८६ घरकुले पूर्ण तर ५२ प्रगतीत असल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)