राज्य कबड्डी संघात स्नेहा टिळवेची निवड
By Admin | Updated: January 23, 2015 00:46 IST2015-01-22T23:19:42+5:302015-01-23T00:46:18+5:30
सराव शिबिरानंतर संघ २७ जानेवारीला रवाना होणार आहे. टिळवे हिची दुसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे

राज्य कबड्डी संघात स्नेहा टिळवेची निवड
सावंतवाडी : भारतीय हौशी कबड्डी संघटनेतर्फे उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली सोनभद्रा येथे २९ जानेवारी ते १ फेबु्रवारी या कालावधीत अखिल भारतीय कुमार गट फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नुकत्याच केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या महाराष्ट्राच्या कुमारीगटाच्या संघाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघात सहभागी झालेली सिंधुदुर्गची स्रेहा टिळवे असून तिला स्पर्धापूर्व सराव शिबिरात सहभागी होण्याचे राज्य कबड्डी असोसिएशनने कळविले आहे. सराव शिबिरानंतर संघ २७ जानेवारीला रवाना होणार आहे. टिळवे हिची दुसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे. ती सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनची खेळाडू असून, शिवगर्जना क्रीडा मंडळाची खेळाडू आहे. आरपीडी हायस्कूलच्या मैदानावर तिचा सराव सुरू असतो. कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष दीपक केसरकर, उपाध्यक्षा बाबला पिंटो, अॅड. अजित गोगटे, दिलीप रावराणे यांनी अभिनंदन केले. शशिकांत नेवगी, खजिनदार दिनेश चव्हाण यांनी तिचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)