उत्पादन शुल्कच्या छाप्यात दीड लाखाची दारू जप्त; एक ताब्यात
By Admin | Updated: May 14, 2014 00:18 IST2014-05-14T00:18:44+5:302014-05-14T00:18:59+5:30
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शासनमान्य बारमध्ये गोवा बनावटीची दारू आणून लेबल काढून या दारूची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते,

उत्पादन शुल्कच्या छाप्यात दीड लाखाची दारू जप्त; एक ताब्यात
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शासनमान्य बारमध्ये गोवा बनावटीची दारू आणून लेबल काढून या दारूची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना मिळताच मंगळवारी येथील वैश्यवाडा भागातील संतोष शरद नार्वेकर यांच्या घरावर धाड टाकून दीड लाखाचा अवैध दारू साठा जप्त केला. या कारवाईने बार मालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. याबाबत माहिती अशी की, वैश्यवाडा भागातील एका बारमध्ये काही दिवसांपूर्वी उत्पादन शुल्कचे अधिकारी आले होते. यावेळी त्यांना काही दारूच्या बाटल्यांवर गोवा बनावटीच्या दारूचे लेबल आढळून आले होते. याबाबतच्या तक्रारीही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे होत्या. त्या दिवशी बारमध्ये गोवा बनावटीची दारू मिळाली नसल्याने अखेर उत्पादन शुल्कचे अधिकारी मागे फिरले होते. मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक दिलीप मोरे, प्रभारी निरीक्षक अमित पडाळकर, महेश शेंडे आदी अधिकार्यांनी संतोष नार्वेकर यांच्या वैश्यवाडा येथील घराची झाडाझडती घेतली. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला घरात ४२ बॉक्स बिअर तसेच ४० लिटर गोवा फेणी व अन्य गोवा बनावटीची दारू आदी मिळून सुमारे १ लाख ५५ हजार ८६० किमतीची दारू आढळून आली. उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी संतोष नार्वेकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला उशिरा येथील न्यायालयात हजर केले असता जामिनावर त्याची मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, सावंतवाडीतील काही बारमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू मिळत असल्याचे यावरून सिद्ध झाले. यापूर्वीही उत्पादन शुल्क विभागाकडे अशा प्रकराच्या तक्रारी होऊनही कोणतीही कारवाई झाली नव्हती. सावंतवाडीतील अनेक बारमध्ये महाराष्ट्राच्या दारूत गोवा बनावटीची दारू मिक्स करीत असल्याचे सांगण्यात आले. यावरून सावंतवाडीतील ‘फिनिक्स’ या बारला चार वर्षांपूर्वी सीलही ठोकण्यात आले होते. पण नंतर एकाही बारवर कारवाई करण्यात आली नसल्याने सध्या मोठया प्रमाणात हा प्रकार सुरू आहे. उत्पादन शुल्क तसेच सावंतवाडी पोलीसही या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. विषारी दारूमुळे अनेक जण यापूर्वी मृत्यूमुखी पडले आहेत. परंतु या दारूत स्लो पॉयझन दारू असल्याने पटकन मृत्यू होत नसल्याने अधिकारी याची दाद घेत नसल्याचे दिसत आहे. बारमध्ये गोवा बनावटीची दारू सावंतवाडी शहरात तर अनेक बारमध्ये गोवा बनावटीची दारू विकली जात असून यापूर्वीहीे अनेक तक्रारी झाल्या. पण उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस आलेल्या तक्रारी फाईल बंद करीत असल्यामुळे शासनमान्य बारमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे पेव फुटले आहे. (प्रतिनिधी)