देवगड, विजयदुर्ग किनाऱ्यावर सुरक्षा मोहीम
By Admin | Updated: November 19, 2015 00:45 IST2015-11-18T23:24:17+5:302015-11-19T00:45:58+5:30
३६ तास सुरक्षा कवच : वाहनांसह, समुद्रात गस्त, मच्छिमार बोटींचीही पाहणी

देवगड, विजयदुर्ग किनाऱ्यावर सुरक्षा मोहीम
देवगड : देवगड व विजयदुर्ग पोलिसांनी सागरी किनारपट्टीवर सागरी सुरक्षा कवच निमित्ताने कडक बंदोबस्त ठेवला असून ३६ तास चालणाऱ्या या सुरक्षा कवचमध्ये प्रत्येक वाहनांची व समुद्रामध्ये गस्त घालून मच्छिमार बोटींची तपासणी केली जाते.
सागरी किनारपट्टीवरील बंदोबस्त किती सशक्त आहे. यासाठी संपूर्ण राज्यभर वर्षामधून दोन वेळा सागरी सुरक्षा कवच बंदोबस्त केला जातो. या सुरक्षा कवचमध्ये नौदल, कोस्टगार्ड, व पोलीस यांच्यामार्फत ही मोहीम राबवली जाते.
रेड टिम सागरी मार्गाद्वारे बोटीतून किनारपट्टी भागामध्ये संशयास्पद प्रवेश करून जाण्याचा प्रयत्न करते. याला ब्ल्यू टीम पकडण्यासाठी या कवचाद्वारे सापळा रचते. सापळ्यामध्ये रेड टिम सहजगत्या सागरी मार्गातून किनारपट्टी भागात प्रवेश करून त्या पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाली. तर प्रवेश केलेल्या किनारपट्टी भागातील सुरक्षा करत असलेल्या पोलिसांवरती व तेथील अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतात.
सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा कवचामुळे देवगड व विजयदुर्ग पोलीस ठाण्यातील कर्मचारी रेड टिम पकडण्यासाठी सज्ज झाले असून ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडत असल्याचे दिसून येत आहे. किनाऱ्यावर तसेच समुद्रातील प्रत्येक वाहन, बोटीचीही तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)