समुद्राच्या उधाणाचा मालवणला फटका
By Admin | Updated: July 16, 2014 23:15 IST2014-07-16T23:09:19+5:302014-07-16T23:15:38+5:30
मालवण दांडी ते देवबागपर्यंतच्या किनारपट्टीवर नागरिकांचे मोठे नुकसान

समुद्राच्या उधाणाचा मालवणला फटका
मालवण : अरबी समुद्राला आलेल्या उधाणाचा फटका बुधवारी मालवण किनारपट्टीला बसला. बुधवारी दुपारी आलेल्या समुद्राच्या भरतीवेळी अजस्त्र लाटांचे तांडव किनारपट्टीवर पहावयास मिळाले. सततच्या लाटांच्या धडाक्याने मालवण दांडी ते देवबागपर्यंतच्या किनारपट्टीवर नागरिकांचे मोठे नुकसान झाले. लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्याचीही मोठी धूप झाली.
सततचा पाऊस आणि सागरी उधाणामुळे मालवण किनारपट्टीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी समुद्राच्या लाटा लोकवस्तीत शिरल्या होत्या. दांडी येथे समुद्राच्या उधाणामुळे सुभाष केळुस्कर यांचे चार माड जमीनदोस्त झाले. विजय बांदेकर यांचा एक माड, प्रभाकर पराडकर यांचे दोन माड, सागरी अतिक्रमणामुळे कोसळले. तसेच दांडी येथीलच सुहास खराडे यांच्या दगडी कंपाऊंडचे नुकसान झाले. कुंपणात समुद्राचे पाणी शिरल्याने जमिनीची मोठी धूप झाली.
किनारपट्टीवर बंधाऱ्याची मागणी
सततच्या लाटांच्या माऱ्यामुळे दांडी चौकचार मंदिराजवळील संरक्षक भिंत उखडली गेली. उधाणामुळे मोरेश्वर मंदिर ते दांडेश्वर मंदिरापर्यंतच्या किनाऱ्याची मोठी धूप झाली. २० ते २५ फुटांपर्यंत समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. किनारपट्टीची मोठी धूप होत असल्यामुळे मालवण किनारपट्टीवर बंधारा किंवा रिंग रोड व्हावा, अशी मागणी पुन्हा एकदा मच्छिमारांमधून होत आहे.
मालवण गवंडीवाडा येथे वीजवाहिन्या तुटून झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे १२ ते १५ घरांतील विजेची उपकरणे जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुधवारी दुपारी वीजवाहिन्या तुटून शॉर्टसर्कीट झाले. यामुळे या परिसरातील १२ ते १५ नागरिकांच्या घरातील टिव्ही, रेफ्रीजरेटर यांसह विद्युत उपकरणे जळाली. पावसामुळे शहरातील कोतेवाडा भागातील संगीता मयेकर यांच्या घराचे छप्पर कोसळल्याने त्यांचे ४८ हजारांचे नुकसान झाले. वायरी भूतनाथ येथेही मंगेश झाड यांच्या घरावर व बाजूच्या शेडवर माडाचे झाड पडल्याने घराचे अंशत: ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबतचा पंचनामा तलाठी मालवणकर यांनी केला. (प्रतिनिधी)