जागावाटपाचा तिढा कायम
By Admin | Updated: September 16, 2014 23:24 IST2014-09-16T22:15:41+5:302014-09-16T23:24:55+5:30
कणकवली मतदारसंघ : राणेंच्या घोषणेनंतरही राष्ट्रवादी आशावादी

जागावाटपाचा तिढा कायम
प्रकाश काळे- वैभववाडी -काँग्रेस नेते पालकमंत्री नारायण राणे यांनी स्वत: कुडाळमधून तर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांची कणकवलीतून उमेदवारी घोषित केली आहे. मात्र, कणकवली मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मतदारसंघात काही पदांवर राष्ट्रवादीने खांदेपालट केला आहे. त्यामुळे आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसल्याने राणेंच्या घोषणेनंतरही कणकवली मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आशावादी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र फाटकांसाठी कणकवली राणेंना तर दीपक केसरकरांसाठी सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा होता. त्यामुळे एकमेकांची गरज लक्षात घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समन्वयातून जागांची अदलाबदल केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचा फायदा झाला तर काँग्रेसचे नुकसान झाले होते. मात्र, ज्यांच्यासाठी आघाडीने त्यावेळी जागांची अदलाबदल केली ते रवींद्र फाटक आणि माजी आमदार दीपक केसरकर शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे २००९ पूर्वीप्रमाणे देवगडचा समावेश असलेला कणकवली मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. तर गेल्याच आठवड्यात सावंतवाडी मतदारसंघाच्या मागणीचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी पुनरुच्चार केला आहे.
कणकवली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या तिन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे या मतदारसंघाची मागणी केली आहे. तर गेल्यावेळच्या अदलाबदलानुसार सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे जुने कोणीच पुढे यायला तयार नाहीत. त्याउलट काँग्रेसकडे माजी राज्यमंत्री प्रविण भोसले व काँग्रेसवासी होण्याआधीपासूनच दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडीत संपर्क असणारे कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर असे दोन सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या सावंतवाडी मतदारसंघ मागणीचा पुनरुच्चार आणि राष्ट्रवादीच्या कणकवलीच्या मागणीच्या आग्रहावर आघाडीच्या जागावाटपात चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे व विधानपरिषद आमदार विजय सावंत यांच्या काँग्रेसकडून मुलाखती झाल्या असल्या तरी नीतेश राणेंची उमेदवारी आजच्या घडीला निश्चित मानली जात आहे. मात्र, आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसल्यामुळे राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. त्यामुळेच पालकमंत्री नारायण राणे यांनी कणकवलीतून नीतेश राणेंच्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी गेल्याच आठवड्यातील काही पदांचा राष्ट्रवादीने मतदारसंघात केलेला खांदेपालट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कणकवलीबाबतचा आग्रह आणि मत्स्य उद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष कुलदीप पेडणेकर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे व डॉ. अभिनंदन मालंडकर यांच्या झालेल्या उमेदवारीसाठी मुलाखतींचा विचार करता आघाडीतील तिढा सुटला नसल्याने कणकवलीबाबत राष्ट्रवादी आशावादी असल्याचे दिसून येते.
राजन तेलींशी कोणतीही कमिटमेंट नाही
राणे समर्थक माजी आमदार राजन तेली यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी तो विनाअट प्रवेश आहे. त्यांच्याशी पक्षाच्या नेतृत्वाने कोणतीही कमिटमेंट केलेली नाही. त्यामुळे सावंतवाडीतील उमेदवारीबाबत त्यांच्या प्रवेशाशी संबंध जोडणे उचित ठरणार नाही, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले आहे.