कोंबड्यांच्या शोधार्थ बिबट्या घुसला घरात
By Admin | Updated: July 19, 2015 23:36 IST2015-07-19T23:03:49+5:302015-07-19T23:36:21+5:30
वनविभागाने केले जेरबंद : तळकट परिसरात खळबळ

कोंबड्यांच्या शोधार्थ बिबट्या घुसला घरात
कसई दोडामार्ग : तळकट कट्टा येथील नारायण जानबा देसाई यांच्या घराला लागून असलेल्या पडवीमध्ये शनिवारी रात्री बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. बिबट्याने देसाई यांच्या कोंबड्यांचा फडशा पाडला. देसाई यांनी प्रसंगावधान राखत हलक्या पावलाने जात बिबट्या घुसलेल्या पडवीचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा तळकट वनबागेतून पिंजरा आणून ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्यास जेरबंद केले व तिलारीच्या जंगलात सोडून दिले.
शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना बिबट्या तळकट-कोलझर जंगलातून भरवस्तीत घुसला. नारायण देसाई यांच्या घराला लागून असलेल्या पडवीमध्ये कोंबड्या होत्या, तर बाजूच्या गोठ्यात म्हशी बांधल्या होत्या. बिबट्याने पडवीच्या दरवाजातून घुसून वीस कोंबड्या फस्त केल्या.
दरम्यान, कोंबड्या मोठमोठ्याने ओरडू लागल्याने नारायण देसाई खडबडून जागे झाले. पडवीच्या दिशेने जाताच त्यांना बिबट्या कोंबड्यांवर ताव मारीत असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून भयभीत झालेल्या देसाई यांचा क्षणभर गोंधळ उडाला. घरात त्यांची पत्नी आणि मुले, तर आजूबाजूलाही लागूनच घरे असल्याने त्यांनी प्र्रसंगावधान राखत हलक्या पावलाने पडवीचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावली. त्यानंतर देसाई यांनी आजूबाजूच्या लोकांना जागे करून त्यांना सर्व प्रकार सांगितला. सर्व ग्रामस्थ त्यांच्या पडवीकडे जमा झाले. देसाई यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.
वनविभागाचे कर्मचारी तळकट वनबागेत असलेला पिंजरा घेऊन आल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. तब्बल दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी, ग्रामस्थ दीपक देसाई, अर्जुन देसाई, प्रमोद देसाई, विष्णू देसाई, रमाकांत गवस तसेच अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला पकडण्यास वनविभागाला शक्य झाले.
यावेळी चंद्रकांत खडपकर, विनोद मयेकर, विलास साळगावकर, प्रकाश गवस, तात्या रेडकर, आदी वनकर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
वनविभागाचे कर्मचारी धारेवर
रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी महादेव नाईक घटनास्थळी दाखल झाले, तर अन्य कर्मचारी रात्री दोन वाजता घटनास्थळी आले, परंतु बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणि अन्य साहित्य न घेताच आल्याने उपस्थित ग्रामस्थ आणि पोलिसांनी वन कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईबाबत त्यांना धारेवर धरले.