क्षमता नसताना सीमकार्ड वाटली
By Admin | Updated: December 26, 2014 23:45 IST2014-12-26T23:38:27+5:302014-12-26T23:45:30+5:30
काँग्रेसचा आरोप : बीएसएनएलच्या टॉवरबाबत आक्षेप; अधिकाऱ्यांना घेराओ

क्षमता नसताना सीमकार्ड वाटली
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात सतत बीएसएनएलच्या सेवेत येणारा व्यत्यय तसेच टॉवरची क्षमता नसतानाही खासगी वितरकाच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात सीमकार्ड वाटण्यात आली आहेत, असा आरोप करत काँग्रेसच्यावतीने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून शुक्रवारी घेराओ घालण्यात आला. यावेळी बीएसएनएलचे जनरल मॅनेजर बी. एस. बिराजदार यांनी ही सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, तर काँग्रेसने बीएसएनएलला २० जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा २६ जानेवारीला उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या घेराओमध्ये शहराध्यक्ष मंदार नार्वेकर, अतुल पेंढारकर, संजू शिरोडकर, अॅड. अनिल निरवडेकर, दिलीप भालेकर, सुधीर आडिवडेकर, संतोष गावस, सत्यवान बांदेकर, नसीर पडवेकर, मीना माटेकर, गोविंद प्रभू, इरफान खान, वैष्णवी ठोबरे, सुफीयान शेख, अमेय प्रभूतेंडूलकर, सुनील इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी काँॅग्रेसने घेराओवेळी अनेक प्रश्न उपस्थित केले. यात सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात बीएसएनएल सेवा खंडित असते. अनेक वेळा रेंजचा प्रश्न ऐरणीवर असतो मात्र, बीएसएनएलच्या कार्यालय दूरध्वनी केला असता उत्तरे योग्य प्रकारे मिळत नाहीत, असा सवाल अतुल पेंढारकर यांनी उपस्थित केला. ही सेवा तातडीने सुरळीत करा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येणार असून तुम्ही लोकांची दिशाभूल करण्याचे सोडून द्या.
गरजेपेक्षा जास्त सिमकार्ड कशाला वाटली, असा सवाल ही काँॅग्रेसने उपस्थित केला. तसेच टॉवरची क्षमता किती सीमकार्डची मग एवढी सीमकार्ड का वाटली. यामागे तुमचा हेतू काय, की खासगी ठेकेदाराना तुम्हाला मोठे करायचे आहे, असा प्रश्न ही काँॅग्रेसने विचारला. यानंतर काँग्रेसच्यावतीने बीएसएनएलला २० जानेवारीची मुदत दिली असून यामुदतीत काम पूर्ण झाले नाही तर २६ जानेवारीला आम्ही बीएसएनएल कार्यालयाशेजारी उपोषण बसणार, असे ही स्पष्ट केले.
बीएसएनएलचे जनरल मॅनेजर बी. एस. बिराजदार यांनी लवकरात लवकर ही सेवा योग्य प्रकारे सुरू करू. भविष्यात ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)