सी वर्ल्डचे भूसंपादन संशयास्पद

By Admin | Updated: November 7, 2014 23:40 IST2014-11-07T21:43:22+5:302014-11-07T23:40:53+5:30

शैलेश भोगले : अतिरिक्त जमीन संपादनाचा घाट

Sea World's Land Acquisition Suspicious | सी वर्ल्डचे भूसंपादन संशयास्पद

सी वर्ल्डचे भूसंपादन संशयास्पद

कणकवली : सी वर्ल्ड प्रकल्पाचा अद्याप प्रकल्प अहवाल तयार झालेला नाही. प्रकल्पाला सुमारे ३०० एकर एवढी जमीन लागणार हे शासनाने मान्य केले असताना पार्किंग आदी सुविधांच्या नावाखाली १०९० अतिरीक्त जमीन संपादन करण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी जयसिंग नाईक उपस्थित होते.
भोगले म्हणाले की, १४ मे २०१३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत समुद्रविश्व (ओशन वर्ल्ड) असा या प्रकल्पाच्या नावात बदल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार झालेला नाही. पुणे येथील सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क या संस्थेला हा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
प्रकल्प आराखडा तयार नसताना ओशन वर्ल्डसाठी ३०० आणि पार्किंग, रेस्टॉरंट आदी सुविधांसाठी १०९० अशा एकूण १३९० एकर जमीन संपादन करण्यास मंजुरी दिली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.
तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजनमधून प्रकल्पासाठी ३० कोटी आगावू देण्यास मान्यता दिली आहे. एकूण भूसंपादनासाठी २२५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
हा प्रकल्प राज्यशासन करत आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणून हा प्रकल्प उभा राहत असताना जिल्हा नियोजनमधून त्यासाठी निधी देण्याची गरज नाही. मालवण येथे सी वर्ल्डसंदर्भातील चित्रफीत दाखवून लोकांची दिशाभूल करण्यात आली.
डॉल्फेनॅरियम तसेच शार्क, व्हेल मासे बंदिस्त करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ‘झू’ विभागाची परवानगी अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यासाठी अद्याप प्रस्तावही सादर झालेला नाही. डॉल्फीन हा भारताचा ‘राष्ट्रीय समुद्री जीव’ असल्याने त्याला बंदीस्त करण्यावर बंदी आहे. त्यामुळे सी वर्ल्ड हा वॉटरपार्क होण्याची शक्यता जास्त आहे. आंतरराष्ट्रीय संघटना ‘पेटा’ चाही विरोध या प्रकल्पाला आहे. सीआरझेडचे निर्बंधही लागू आहेत. असे असताना या प्रकल्पासाठी भूसंपादनाची गडबड करण्यात येत आहे. शासनाकडून याबाबत पारदर्शकता ठेवण्यात आलेली नसून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे ही माहिती दिली जाणार असल्याचे शैलेश भोगले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Sea World's Land Acquisition Suspicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.