स्कुबा डायव्हिंग वाद भडकणार?
By Admin | Updated: December 2, 2015 00:44 IST2015-12-01T22:23:08+5:302015-12-02T00:44:14+5:30
परवानाधारक उपोषणाच्या पवित्र्यात : विनापरवाना व्यावसायिकांवर कारवाई होणार

स्कुबा डायव्हिंग वाद भडकणार?
मालवण : मालवण किनारपट्टीवर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले स्कुबा डायव्हिंग अधिकृत-अनधिकृत हा वाद पुन्हा एकदा भडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मालवण बंदर जेटी येथे परवानाधारक स्कुबा डायव्हिंग व्यवसाय सुरू असताना देवबाग येथे अनधिकृत स्कुबा डायव्हिंग व्यवसायिकांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा सिंधुदुर्ग जलक्रीडा सेवा सहकारी संस्था व्यावसायिकांनी घेतला आहे.अनधिकृत व्यावसायिकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत परवाने घ्यावेत; अन्यथा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने कारवाईचा इशारा तहसीलदार वनिता पाटील यांनी यापूर्वीच दिला होता. ३० नोव्हेंबरची मुदत संपली असल्याने अनधिकृत व्यावसायिकांनी परवाने मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवावा; अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी तयारी स्कुबा डायव्हिंग अधिकृत संस्था व्यावसायिकांनी केली आहे. अनधिकृत स्कुबा डायव्हिंग सुरु राहिल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय परवानाधारक व्यावसायिकांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)
कोणत्याही क्षणी कारवाई : तहसीलदार
तहसीलदार वनिता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, अनधिकृत व्यावसायिकांना परवाने घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानंतरही हा व्यवसाय विनापरवाना सुरु असेल तर कोणत्याही क्षणी योग्य अशी कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर पर्यटकांची सुरक्षा व परवाने घेऊन अधिकृत व्यावसायिकांनी व्यवसाय करावा, असेही सांगण्यात आले आहे.