‘स्कुबा डायव्हिंग’ आजपासून अधिकृत
By Admin | Updated: November 11, 2015 00:13 IST2015-11-10T21:28:10+5:302015-11-11T00:13:28+5:30
प्रशासनाचा ‘हिरवा कंदील’ : अनधिकृत व्यावसायिकांवर होणार कारवाई

‘स्कुबा डायव्हिंग’ आजपासून अधिकृत
मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या जलक्रीडा प्रकारातील स्कुबा डायव्हिंगला जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. सिंधुदुर्ग जलक्रीडा सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून मालवणातील २४ व्यावसायिकांनी ‘एक खिडकी’च्या माध्यमातून सुरु केलेल्या परवाना प्रक्रियेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. परवाना नसतानाही पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन सुरु असणाऱ्या व्यवसायास शासनाकडून मान्यता मिळण्यासाठी मालवणातील स्कुबा व्यवसायिकांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करत परवान्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेला स्कुबा डायव्हिंग जलक्रीडा प्रकारासाठी परवानगी दिली आहे. दिवाळी पर्यटन हंगामात बुधवार ११ नोव्हेंबरपासून स्कुबा डायव्हिंग हा जलक्रीडा प्रकार सिंधुदुर्ग किनारपट्टीवर अधिकृतरित्या पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. अनेक प्रकारच्या जलक्रीडापैकी स्कुबा डायव्हिंग या पहिल्याच प्रकाराला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिल्याने अन्य जलक्रीडा प्रकारही मान्यतेच्या छत्राखाली येतील अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. मालवण तहसीलदार दालनात मंगळवारी तहसीलदार वनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्कुबा डायव्हिंग परवान्याबाबत बैठक पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रुपेश प्रभू, सचिन गोवेकर, दामू तोडणकर, सतीश आचरेकर आदी स्कुबा डायव्हिंग व्यवसायिक उपस्थित होते. तहसीलदार पाटील यांनी व्यावसायिकांना अटी, शर्ती व नियमांची माहिती दिली. बंदर निरीक्षकांनाही व्यवसायावर लक्ष ठेवण्याचे आदेश देत अनधिकृत व्यावसायिक व नियम मोडणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या
आहेत. (प्रतिनिधी)