अधिवेशनाच्या काळातच विज्ञानप्रदर्शनाचा घाट
By Admin | Updated: December 2, 2014 00:28 IST2014-12-01T21:46:15+5:302014-12-02T00:28:13+5:30
आमदारांना विश्वासात न घेताच ठरवली तारीख

अधिवेशनाच्या काळातच विज्ञानप्रदर्शनाचा घाट
सावंतवाडी : गेली पाच वर्षे सावंतवाडीची आमसभा झाली नसताना आता ऐन विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावरच विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचा घाट पंचायत समितीने घातला आहे. याबाबतचे निमंत्रण देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे गेले होते. मात्र, केसरकरांनी विज्ञान प्रदर्शनाच्या तारखेवर नाराजी व्यक्त करत हजर राहण्यास असर्मथता दर्शवली आहे. सावंतवाडी पंचायत समिती ही काँॅग्रेसच्या ताब्यात असून आमदार हे शिवसेनेचे असल्याने हा वाद सुरू आहे.सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा गेली पाच वर्षे झाली नाही. अनेकवेळा आमसभेची तारीख ठरवत असताना ज्या तारखेला आमदार केसरकर यांना वेळ नाही अशीच तारीख ठरवली जात होती.
राज्यात आघाडी असताना मात्र, सावंतवाडीत काँॅग्रेस व राष्ट्रवादी काँॅग्रेसमध्ये विस्तव जात नव्हता. अशीच परस्थिती होती. त्यामुळे ही आमसभा शेवटपर्यंत झाली नाही. मात्र, अन्य तालुक्याच्या आमसभा झाल्या.
आता आमदार केसरकर हे नव्याने शिवसेनेतून निवडून आले असून पंचायत समिती मात्र आजही काँग्रेसच्या ताब्यात आहे. आणि या वर्षातले पहिलेच विज्ञान प्रदर्शन हे सावंतवाडी पंचायत समितीच्यावतीने आयोजित करण्यात येते. या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक आमदारांच्या हस्ते होणे क्रमप्राप्त असते.
त्यामुळे गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार दीपक केसरकर यांची भेट घेतली व त्यांना विज्ञान प्रदर्शनास येण्याची विनंती केली तसेच पंचायत समितीच्यावतीने ८ नोव्हेंबर ही तारीख निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, आमदार केसरकर यांनी या तारखेबाबत नाराजी व्यक्त केली. माझे विधानसभेचे अधिवेशन नागपूर येथे आहे. मग मी कसा उपस्थित राहणार आणि ऐन अधिवेशनाच्या काळातच कसे विज्ञान प्रदर्शन भरवले जाते? मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. याची आठवणही केसरकरांनी या अधिकाऱ्यांना करून दिली. मात्र, अधिकाऱ्यांनी आपण पूर्वी ४ डिसेंबर ही तारीख निश्चित केली होती. पण काही अडचणीमुळे ८ डिसेंबर ही तारीख निश्चित केल्याचे ते म्हणाले.
यावर आमदार केसरकर यांनी नाराजी व्यक्त करत आपण या विज्ञानप्रदर्शनाला उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे तुम्ही तारीख बदला अन्यथा कार्यक्रम घ्या, असा सल्लाही यावेळी केसरकरांनी दिला आहे. केसरकरांच्या या पावित्र्यामुळे अधिकारी आल्या पावली निघून गेले.
याबाबत गटविकास अधिकारी शरद महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, विज्ञान प्रदर्शनाची तारीख किती आहे, हे मला माहीत नाही. खात्री करून तुम्हाला माहिती देईन, असे त्यांनी स्पष्ट केले तर गटशिक्षण अधिकारी शिवाजी देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते माडखोल येथे गेल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)