उभादांडा ग्रामस्थांचा शाळा बंदचा इशारा
By Admin | Updated: August 7, 2014 00:29 IST2014-08-06T21:16:07+5:302014-08-07T00:29:41+5:30
कायमस्वरुपी शिक्षक न मिळाल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा

उभादांडा ग्रामस्थांचा शाळा बंदचा इशारा
वेंगुर्ले : शिक्षण खात्याच्या दुर्लक्षापणामुळे व नेमणूक झालेल्या कामगिरी शिक्षकांमुळे उभादांडा-केपादेवी शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला पूर्णपणे शिक्षण खाते जबाबदार आहे. शाळेला १४ आॅगस्टपर्यंत कायमस्वरुपी शिक्षक न मिळाल्यास १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाळेला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ९ आॅक्टोबर २०१२ पासून आजपर्यंत केपादेवी शाळेत दोनच शिक्षक कार्यरत आहेत. शाळेला दिला जाणारा तिसरा शिक्षक हा कामगिरी शिक्षक म्हणून देण्यात आला आहे. शाळेची पहिली ते सातवीपर्यंतची पटसंख्या ६७ आहे. कायमस्वरुपी शिक्षकासाठी सतत दोन वर्षे उठाव केला जात आहे. परंतु शिक्षण खात्याने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. १४ आॅगस्टपर्यंत कायमस्वरुपी शिक्षक न मिळाल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर शिक्षक -पालक संघाचे अध्यक्ष दिलीप डिचोलकर, महेंद्र तांडेल, रमाकांत गिरप, भाग्यवान गिरप, वासुदेव देवजी, ललिता डिचोलकर यांच्यासह ४५ ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)