पंचायत समितीतच भरली शाळा

By Admin | Updated: September 11, 2014 23:11 IST2014-09-11T21:40:49+5:302014-09-11T23:11:28+5:30

अधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ : वडखोल ग्रामस्थांची नाराजी

School filled in Panchayat Samity | पंचायत समितीतच भरली शाळा

पंचायत समितीतच भरली शाळा

वायंगणी : वडखोल शाळेत कायमस्वरुपी मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक मिळण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. याप्रकरणी प्रशासनाकडून शिक्षक नियुक्ती देण्यास असमर्थता दर्शविली गेल्याने आज गुरुवारी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या कार्यालयात शाळा भरविली.  याबाबत गटशिक्षणाधिकारी ओरोसल्या गेल्याने व बीडिओ सुट्टीवर असल्याने कोणत्याही अधिकारी या आंदोलकांना भेटला नसल्याने आंदोलक उशिरापर्यंत कार्यालयात थांबून होते. तसेच अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत शिक्षक नियुक्ती होत नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहणार, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
वडखोल ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समिती कार्यालयात आंदोलनाला सुरुवात केली असतानाच दाभोस शाळेतील सहाय्यक शिक्षक प्रसाद जाधव यांची वडखोल शाळेत तात्पुरती बदली केल्याने दाभोस शाळेतील मुलांचे नुकसान होत असल्याने दाभोस येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागास निवेदन सादर करत बदली रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.दरम्यान, वडखोल शाळेस कायमस्वरुपी मुख्याध्यापक व सहशिक्षक देण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वारंवार गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी यांच्याकडे मागणी केली होती. तसेच ९ सप्टेंबरपासून शाळेच्याच मैदानावर पालकांनीच शाळा घेत अनोखे आंदोलन केले. त्यावेळी वळवी यांनी तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे जास्त असल्याने कायमस्वरुपी शिक्षक देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर गुरुवारी ग्रामस्थांनी मुलांसह पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडत शाळा भरविली. सायंकाळी उशिरापर्यंत गटशिक्षणाधिकारी कामानिमित्त ओरोस येथे गेल्या असल्याने व गटविकास अधिकारी सुट्टीवर असल्याने कोणाचीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाली नव्हती. त्यामुळे वडखोल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. दाभोस ग्रामस्थ शिक्षकाची बदली रद्द होण्यासाठी व वडखोल ग्रामस्थ शिक्षक नियुक्तीसाठी एकाचदिवशी दाखल झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची दिवसभर तारांबळ उडाल्याचीच स्थिती पाहवयास मिळाली.
पंचायत समितीच्या ठिय्या आंदोलनात शाळा समितीचे अध्यक्ष जयवंत पालव, मानसी पालव, बाळकृष्ण धुरी, मदन पालयेकर, बाळू परब, आनंद धुरी, समाधान परब, विनोद परब, नारायण पडते, विलास धुरी, रामचंद्र पालव, मनोहर पालव, सिध्देश पालव, दीपक राऊळ, यशवंत परब, प्रसाद पालव, सत्यभामा पालव, आदी पालक व ग्रामस्थांसह विद्यार्थी सहभागी झाले होते. या ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. (वार्ताहर)

सभापतींची ग्रामस्थांच्या आंदोलनस्थळी भेट
वडखोल ग्रामस्थांच्या आंदोलनाला पंचायत समिती सभापती अभिषेक चमणकर यांनी भेट दिली. त्यांनी होडावडा सुभाषवाडी येथील शाळेतील एका शिक्षकाची वडखोल शाळेत नियुक्ती केली असून दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती २५ सप्टेंबरपर्र्यंत करणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. तर दाभोसवाडा शाळेतील शिक्षकांची वडखोल शाळेत केलेली नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे सभापती चमणकर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: School filled in Panchayat Samity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.