विखुरलेल्या तावडे कुटुंबांना अतिथी भवन एकत्र आणेल
By Admin | Updated: December 2, 2014 23:31 IST2014-12-02T22:46:01+5:302014-12-02T23:31:17+5:30
विनोद तावडे : आडिवरे येथे उलगडला सत्तर वर्षांचा इतिहास

विखुरलेल्या तावडे कुटुंबांना अतिथी भवन एकत्र आणेल
राजापूर : जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या तावडे कुटुंबीयांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम आडिवरे येथे बांधण्यात येणारे नियोजित अतिथी भवन करेल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आडिवरे येथे व्यक्त केला.
क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धिनी मंडळ, मुंबईच्यावतीने आडिवरे - नवेदर येथे उभारण्यात येणाऱ्या तावडे अतिथी गृहाच्या भूमिपूजनप्रसंगी तावडे बोलत होते. त्यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, दिनकर तावडे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, सतीश शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हे तावडे अतिथी भवन उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष इंद्रनील तावडे यांच्याहस्ते पार पडले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शालेय शिक्षणमंत्र्यांनी नियोजित तावडे भवनाबाबत गौरवोद्गार काढले. देश - विदेशासह इतरत्र विखुरलेल्या तावडे कुटुंबीयांचा इतिहास फार मोठा आहे. इतिहास काळासह योगदान मोलाचे आहे. तथापी त्या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम होते.
हे काम अतिथी भवन निश्चित करेल आणि त्यातूनच आपल्या इतिहासाची जाणीव तावडेंना करुन देता येईल, असा विश्वास विनोद तावडेंनी व्यक्त केला. या भवनाला सहकार्य करणारी लाखमोलाची माणसेदेखील मिळवून देवू, असे सांगताना हे भवन केवळ विनोद तावडेंचे नाही, तर समस्त तावडे कुटुंबीयांचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तावडे हितवर्धिनी मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये समाज बांधवांसाठी वधू-वर मेळावे, वार्षिक कुलसंमेलन, वाढदिवस समारंभ, धार्मिक कार्य, गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत समाजोपयोगी मदत अशी विविध कामे मागील ७० वर्षे सुरु आहेत. भविष्यात नियोजित वास्तूमधूनदेखील असे उपक्रम मार्गी लागतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
राज्यात नवीन अधिकारीपदी आलेल्या भाजपाप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारमधील शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणारे विनोद तावडे हे राजापूर तालुक्यात येणारे पहिले मंत्री ठरले. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला. (प्रतिनिधी)