पाण्याचे दुर्भिक्ष्य पाचवीलाच पुजलेलेच
By Admin | Updated: June 3, 2015 01:25 IST2015-06-03T01:18:18+5:302015-06-03T01:25:36+5:30
असंख्य ग्रामस्थ टांगणीला : दऱ्या खोऱ्यातील रहिवाशांना पाण्यासाठी करावा लागतो मैलोन मैल प्रवास...

पाण्याचे दुर्भिक्ष्य पाचवीलाच पुजलेलेच
देवरूख : चाफवलीजवळील भोयरेवाडी, धनगरवस्तीत गेली कित्येक वर्षे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. येथील महिला-मुलांना एक किलोमीटरची पायपीट करून दऱ्याखोऱ्यांतून पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे एवढ्या लांब उन्हातान्हातून गेल्यानंतर तेथे पाणी मिळेल, याची शाश्वती नसल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. येथील पाणीटंचाई तातडीने दूर करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
चाफवली भोयरेवाडी हे सुमारे २०० लोकसंख्येची वाडी आहे. येथे २००७मध्ये जलस्वराज योजना चालू केली गेली. मात्र ती कशीतरी काही दिवस चालली. त्यानंतर बंद पडली. सततच्या तक्रारीनंतर येथे टँकर सुरू करण्यात आला आहे. मात्र तो ५ ते ७ दिवसांतून येतो. ते पाणी लोकांना, जनावरांना पुरत नाही. त्यामुळे लोकांना एक किलोमीटर पायपीट करून दऱ्याखोऱ्यांतून पाणी आणावे लागते. झऱ्यातून बेलट्याने (छोट्याशा प्लॅस्टिकच्या भांड्याने) पाणी भरून महिला, मुले पाणी आणतात. एक हंडा पाणी मिळवण्यास एक तास लागतो. शिवाय येथे मिळेल ते व मिळेल तसले पाणी आणावे लागते. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही वाडीत सतत काविळीची साथ सुरू आहे.
येथे पाणी पुरवठा करण्याबाबत आजपर्यंत अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र त्यांची पूर्तता होत नाही. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांचाच पाऊस पडतो आणि प्रत्यक्ष पावसाळा सुरु झाल्यावर ती सारी आश्वासने पावसाबरोबर धुवून निघतात. अशीच स्थिती या वाडीची झाली आाहे. पाणी हे जीवन आहे पण याच जीवनाला प्राप्त करण्यासाठी या वाडीतील गर्भवती महिलांवरही आपला जीव धोक्यात घालून मुलाबाळांच्या आणि जनावरांसाठी पाणी आणण्याचे काम करावे लागत आहे.
शासनाच्या अनास्थेने या वाडीतील ग्रामस्थ सतत किती भयंकर, भीषण अशा दुष्काळाला दरवर्षी सामोरे जात आहेत. याचा अनुभव घेतला तर कोणत्याही सहृदयी माणसाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. २१ व्या शतकात प्रगतीच्या पोकळ आकडेवारीचा दस्ताऐवज सांभाळणाऱ्या शासनाला प्रत्यक्षात या तहानलेल्या वाड्या-वस्त्यांचे भीषण वास्तव कधी कळणार? हाच प्रश्न या धनगर वस्तीतील ग्रामस्थ विचारत आहेत. प्रशासनाने लक्ष घालून येथील पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा व लोकांचे हाल थांबवावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
देवरूखजवळील चाफवली, भोयरेवाडी व आसपासच्या गावातील पाणी प्रश्न गंभीर बनला जात असून महिलांच्या डोक्यांवरचा हंडा अद्याप खाली आलेला नाही. हे चित्र किती दिवस राहणार
केवळ २०० लोकवस्तीच्या वाडीतही पाणी पुरवठा व्यवस्थित झालेला नाही. वर्षानुवर्षे ही परिस्थिती कायमच असून जलस्वराज्य योजनेतूनही वाडीला पाणी मिळाले नाही हे सत्य आहे.
शासनाच्या अनास्थेने वाड्या वस्त्यांवरील पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याबाबत वेळोवेळी चर्चा होऊनही अनेक वर्षे पिण्याचा प्रश्न सोडवू शखत नसल्याबद्दल तीव्र नाराजी आहे.
वाडीतील जनावरांना पाणी उपलब्ध होत नाही. माणसांवरही पाण्याचे संकट कायम आहे. काही किलोमीटरचा प्रवास करूनही हाती एक हंडाही पाणी लागत नसल्यामुळे किती वर्षे वाट पाहायची असा प्रश्न विचारला जात असून तहानलेल्या वाड्यांवर पाणी कधी उपलब्ध होणार याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
केवळ २०० लोकवस्तीच्या वाडीतही पाणी पुरवठा व्यवस्थित झालेला नाही. वर्षानुवर्षे ही परिस्थिती कायमच असून जलस्वराज्य योजनेतूनही वाडीला पाणी मिळाले नाही हे सत्य आहे.