बचत गटांची लाखोंची उड्डाण
By Admin | Updated: January 19, 2015 00:22 IST2015-01-18T23:19:55+5:302015-01-19T00:22:47+5:30
सरस प्रदर्शन : तब्बल २८लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले े

बचत गटांची लाखोंची उड्डाण
रत्नागिरी : स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत असलेल्या महिला बचत गटांनी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनामध्ये ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने विक्रीची लाखोंची उड्डाणे पार केली. या प्रदर्शनात २८ लाख रुपये मालाची विक्री झाली़
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंसहाय्यता बचत गटांची स्थापना केली आहे़ या बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ‘स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजने’अंतर्गत प्रदर्शन व विक्री जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येते़ हे जिल्हास्तरिय सरस प्रदर्शन व विक्री २०१४ रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे दि़ २४ ते २८ डिसेंबर या कालावधीमध्ये लावण्यात आले होते़ हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास यंत्रणा यांनी विशेष मेहनत घेतली़ या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील ८६ बचत गट सहभागी झाले होते़ वर्षाच्या सरत्या दिवसांमध्ये हे व्रिकी व प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याने हजारो पर्यटकांनी पाच दिवसांमध्ये भेटी दिल्या़ या प्रदर्शनामध्ये बचत गटांनी तयार केलेले, कोकणी पध्दतीचे खाद्यपदार्थ ते शोभेच्या वस्तू अशा सर्वच मालाला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला़ त्यामुळे २८ लाख रुपयांची उलाढाल झाली़ ग्राहकांची गर्दी पाहून बचत गटांच्या महिलांनीही उत्साहाने आपल्या मालाची जास्तीत जास्त विक्री कशी करता येईल, त्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याने ते यशस्वीही झाले़ (शहर वार्ताहर)
उत्कृष्ट विक्री
झालेले बचत गट
प्रथम क्रमांक- श्रेयस स्वयंसहाय्यता बचत गट, ता़ गुहागर
द्वितीय क्रमांक- भैरवनाथ स्वयंसहाय्यता बचत गट, ता़ दापोली़
तृतीय क्रमांक- झोलाईदेवी स्वयंसहाय्यता बचत गट, ता़ चिपळूण