वाहून जाणाऱ्या पर्यटकांना वाचविले
By Admin | Updated: July 16, 2014 23:16 IST2014-07-16T23:10:09+5:302014-07-16T23:16:47+5:30
झरेबांबर येथील घटना : वृक्ष कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

वाहून जाणाऱ्या पर्यटकांना वाचविले
दोडामार्ग : अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिंकाणचे कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. झरेबांबर येथील कॉजवेवरून मांगेली येथे वर्षा पर्यटनासाठी गेलेले पर्यटक वाहून जाण्याची घटना घडली. मात्र ग्रामस्थांनी त्यांना वाचविले. आंबेली कोनाळकरवाडी येथे जुनाट वृक्ष कोसळल्याने वाहतूक तीन तास ठप्प होती.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर जाणवत आहे. झरेबांबर येथील कॉजवेवरुन वाट काढीत असताना गोव्यातील दोघे पर्यटक वाहून जाण्याची घटना घडली. हे पर्यटक दुचाकीने मांगले येथे वर्षा पर्यटनासाठी गेले होते. माघारी येताना झरेबांबर येथील ओहोळावर ते पोहोचले. पुलावर पाणी असल्याने अन्य वाहनचालक व प्रवासी पाणी ओसरण्याची वाट पाहत होते. मात्र, या अतिउत्साही पर्यटकांनी पाण्याच्या प्रवाहातूनच पलीकडे जाण्याचा निर्णय घेतला.
पुलावरील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकी पुलाच्या मधोमधच जाऊन बंद पडली. आणि दोन्ही पर्यटक वाहून जाऊ लागले. हा प्रकार उपस्थित वाहनचालकांच्या लक्षात येताच त्यांनी पर्यटकांना वाचविले. ते पर्यटक गोव्यातीलच असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, त्यांची नावे उशीरापर्यंत समजू शकलेली नाहीत.
दरम्यान, बुधवारी दुपारी आंबेली परिसरात वादळी वारा सुरु झाला होता. त्यामुळे दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावरील जुनाट वृक्ष कोसळला. झाड पडल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प होती. सायंकाळी उशीरा झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुसळधार पावसामुळे तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. दोडामार्ग शहरासही आयी, माटणे, आंबडगाव या भागातील वीज गायब होती. बुधवारी संपूर्ण दिवसभर वीजेचा लपंडाव सुरूच होता. (प्रतिनिधी)