सातार्डा सरपंचाचा तडकाफडकी राजीनामा
By Admin | Updated: June 30, 2015 00:17 IST2015-06-29T23:23:15+5:302015-06-30T00:17:09+5:30
काँग्रेसवर नाराज : राजीनाम्याबाबत उलटसुलट चर्चा

सातार्डा सरपंचाचा तडकाफडकी राजीनामा
सावंतवाडी : सातार्डा सरपंच उदय पारिपत्ये यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा तीन दिवसांपूर्वी सभापती प्रमोद सावंत यांच्याकडे सोपविला आहे. सातार्डा सरपंच म्हणून त्यांनी गेली अडीच वर्षे उत्तमरित्या काम केले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसवर नाराज असल्याने सक्रिय राजकारणातून दूर होते. तसेच उत्तम स्टील कंपनीबाबतही त्यांचा लढा सुरूच होता.
सातार्डा येथे सरपंच उदय परिपत्ये व सहकाऱ्यांनी मिळून कॉंग्रेसची सत्ता आणली होती. गेली अडीच वर्षे ते कॉग्रेसचे सरपंच म्हणून एकहाती सत्ता राबवत होते. या काळात उत्तम स्टील कंपनीने लोकांची कशी फसवणूक केली, तसेच ना हरकत दाखल्यावरून मंत्रालय पातळीपर्यत लढा सुरू ठेवला होता. या लढ्याला भाजप तसेच शिवसेना यांनीही त्यांना साथ दिली होती. मात्र, चार दिवसांपूर्वी त्यांनी अचानक आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा सभापती प्रमोद सावंत यांच्याकडे सोपवला आहे. राजीनाम्याचे कारण मात्र समजू शकले नाही. पारिपत्ये हे गेले सहा महिने सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांना काँग्रेसच्या कोणत्याही मोठ्या विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. आता पारिपत्ये यांच्या राजीनाम्यानंतर सातार्डा सरपंचपदी कोणाची वर्णी लागते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
पुढच्या निर्णयाबाबत अद्याप काही नाही
याबाबत उदय पारिपत्ये यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्या सरपंचपदाच्या कारकिर्दीला अडीच वर्र्षे पूर्ण झाली. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसवर नाराज आहे. हे पूर्वीच सांगितले आहे. पण सध्या मी कुठल्याही पक्षात नाही. अद्याप पुढचा निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.