सावंतवाडीत डास झिरो नाही हिरोच
By Admin | Updated: September 30, 2015 00:09 IST2015-09-29T21:44:37+5:302015-09-30T00:09:31+5:30
परूळेकरांचा साळगावकरांना टोला : रूग्णालयामध्ये माहिती घेण्याचा सल्ला

सावंतवाडीत डास झिरो नाही हिरोच
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका ‘झिरो डास’चा दावा करीत आहे. मात्र, हा दावा सपशेल खोटा असून सावंतवाडीत डास झिरो नसून हिरोच आहेत. त्यामुळे रूग्णालये भरलेली दिसत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, शिक्षण सभापती गुरू पेडणेकर, माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, सुधीर आडिवडेकर, साक्षी वंजारी, संदीप सुकी, दिलीप भालेकर, संतोष जोईल आदी उपस्थित होते.
सावंतवाडी नगरपालिका स्मार्ट सिटीची स्वप्ने बघत आहेत. पण त्यांनी पायाभूत सुविधांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. मोती तलावाकाठचा विकास म्हणजे शहराचा विकास म्हणणे चुकीचे असून शहरातील रस्ते तसेच आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून याकडे दुर्लक्ष होत आहे. पालिका मोठ्या प्रमाणात उत्पादन घेते. पण त्याचा फायदा कुणाला होतो, असा सवाल करीत पालिकेचे सुसज्ज असे रूग्णालय नाही, अशी खंत डॉ. परूळेकर यांनी व्यक्त केली.
पालिका एक डॉक्टर व एक कंपाऊं डर यांच्यावरच आतापर्यंत दिवस ढकलत असून मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्त्रोत या पालिकेकडे आहे. ते पाणी इतर गावांना देऊन त्यातून येणाऱ्या उत्पादनातून वेगवेगळे प्रकल्प तसेच सुसज्ज हॉस्पिटल करण्यात येऊ शकते. पण त्याकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. शहरातील रस्ते अरूंद आहेत. भविष्यात पर्यटन दृष्ट्या जर शहराचा विकास व्हायचा असेल, तर रस्ते मोठे करणे गरजेचे आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी शहरातून जाणारा महामार्ग कुणाची संपत्ती वाचण्यासाठी बाहेरून गेला, हे जाहीर करावे. याचा मोठा परिणाम आता येथील बाजारपेठांवर दिसू लागला असून, भविष्यात जर यापेक्षाही सावंतवाडीचा विकास करायचा झाला, तसेच पर्यटक या ठिकाणी आणायचे झाले, तर त्यासाठी वेगळी योजना आखावी लागेल. मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवण-तारकर्लीकडे वळू लागले आहेत, असेही यावेळी डॉ. परूळेकर
म्हणाले. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांना का घेराव घालता?
सातारा येथे जाणारी धान्याची पोती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली. ही धान्याची पोती पकडली ही बाब चांगली, पण सत्तेत राहून अधिकाऱ्यांना कसला घेराव घालता? हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांना घेराव घाला आणि जाब विचारा.
काँग्रेस नेते नारायण राणे असताना अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची कधी नामुष्कीही काँग्रेस कार्यकर्त्यांवर आली नव्हती. पण आताच्या पालकमंत्र्यानी ही नामुष्की कार्यकर्त्यांवर आणली, असा आरोपही परूळेकर यांनी केला..
अधिकाऱ्यांना का घेराव घालता?
सातारा येथे जाणारी धान्याची पोती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली. ही धान्याची पोती पकडली ही बाब चांगली, पण सत्तेत राहून अधिकाऱ्यांना कसला घेराव घालता? हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांना घेराव घाला आणि जाब विचारा.
काँग्रेस नेते नारायण राणे असताना अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची कधी नामुष्कीही काँग्रेस कार्यकर्त्यांवर आली नव्हती. पण आताच्या पालकमंत्र्यानी ही नामुष्की कार्यकर्त्यांवर आणली, असा आरोपही परूळेकर यांनी केला..