सासोलीत रस्ताच गेला चोरीला
By Admin | Updated: February 24, 2015 00:02 IST2015-02-23T21:58:40+5:302015-02-24T00:02:13+5:30
दोडामार्ग तालुक्यात खळबळ : नसलेल्या रस्त्याचा केला मूल्यमापन अहवाल

सासोलीत रस्ताच गेला चोरीला
दोडामार्ग : पैसे, मौल्यवान वस्तू, दागदागिने चोरीस जाण्याच्या घटना आतापर्यंत अनेकवेळा घडल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषदेचा रस्ता चोरीस जाण्याची घटना कधी ऐकिवात नाही. परंतु असा प्रकार घडला आहे. दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावात सासोली मुख्य रस्ता ते वाघमळा या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण न करताच परस्पर काम केल्याची रक्कम अदा करण्याचा प्रकार याठिकाणी घडल्याचे उघडकीस आले आहे. आणि मुख्य म्हणजे रस्त्याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्यांनी रस्ताच जाग्यावर नसताना रस्त्याचे मूल्यमापन करून तसा अहवाल ग्रामपंचायतीला दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली असून, हे प्रकरण चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.
सासोली मुख्य रस्ता ते वाघमळा या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व दुरुस्तीचे काम मंजूर झाले होते. मात्र, प्रत्यक्षात काम झाले नसताना काम झाल्याचे दाखवून आणि जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता राजन पाटील यांनी रस्ताच अस्तित्वात नसताना त्याचे मूल्यांकन करण्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ग्रामपंचायत उपसरपंच दीपिका ठाकूर व इतर चार सदस्यांनी दोडामार्ग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, सभापती महेश गवस यांना निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार सोमवारी सभापती महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर, गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण आदींनी ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी केली. यावेळी सरपंच गुरुदास गांजील, ग्रामसेविका एस. पी. जगताप, ग्रामपंचायत सदस्य गिरीश डिचोेलकर, अनिल परब, अनिरुध्द फाटक आदी उपस्थित होते.
या चौकशीत सन २०१५ मध्ये हे काम मंजूर झाल्याचे आढळले. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे काम झाले नसताना परस्पर बिलापोटी ८०,०००१ चा धनादेश देण्यात आल्याचे आढळले. याबाबत खुलासा करताना सरपंच गुरुदास गांजील यांनी जिल्हा परिषद बांधकामचे शाखा अभियंता राजन पाटील यांनी रस्त्याचे १ लाख ४५ हजार रुपयांचे मूल्यांकन केल्याचा अहवाल दिला.
त्यानुसार ग्रामपंचायतीकडून ग्रामसेविका एस. पी. जगताप यांनी धनादेश काढल्याचे सांगितले. मात्र, ग्रामपंचायत सदस्य अनिल परब यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी बिल अदा करण्यास विरोध केला असताना बिल का काढले, असा सवाल उपस्थित केला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीचे प्रोसेडिंग तपासण्यात आले असता, त्यात रिकामी जागा सोडण्यात आल्याचे आढळून आले. यावेळी सभापती महेश गवस यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
लाचखोरीचा आरोप
सासोली ग्रामपंचायतीचे सरपंच गुरुदास गांजील यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजन पाटील हे लाचखोर असल्याचा आरोप केला. प्रत्यक्षात काम नसताना रस्त्याचे मूल्यमापन कसे काय आणि कोणत्या आधारावर करण्यात आले, असाप प्रश्न त्यांनी उपस्थित केला.