साखरोळीतील घटना : एक गंभीर, दोघे जखमी; मध्यरात्री भयाचे तांडव; तलवारीसह अन्य शस्त्रांचा वापर
By Admin | Updated: July 22, 2014 23:57 IST2014-07-22T23:56:45+5:302014-07-22T23:57:57+5:30
कुटुंबाच्या हल्ल्यात एक ठार

साखरोळीतील घटना : एक गंभीर, दोघे जखमी; मध्यरात्री भयाचे तांडव; तलवारीसह अन्य शस्त्रांचा वापर
दापोली : अख्खे घर साखरझोपेत असताना हातात तलवारी, कुऱ्हाड, कोयता व चॉपर घेऊन घराच्या मागचा दरवाजा तोडून आत शिरलेल्या चार महिलांसह तीन तरुणांनी आपल्या चुलत्याचा पाठलाग करून निर्घृण खून केला. एवढेच नव्हे, तर इतर तिघाजणांना जखमी केले आहे. त्यातील एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे. आज, मंगळवारी पहाटे दोन वाजता तालुक्यातील साखरोळी येथे ही घटना घडली. प्रथमदर्शनी हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाले असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामागे भगतगिरी कारणीभूत असण्याची शक्यता अधिक आहे.
साखरोळी नं. १ येथील हनुमानवाडीत रमेश पांडुरंग मिसाळ, त्यांची पत्नी ऋचिता रमेश मिसाळ, मुलगा रूपेश, सून प्रणया, दुसरा मुलगा प्रफुल्ल व नातू वेदांत आपल्या घरात गाढ झोपले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागच्या दारावर जोरदार लाथांचा तसेच शिव्यांचा आरडाओरडा ऐकायला येऊ लागला. काहीतरी विपरीत घडणार असे वाटत असतानाच मागचा दरवाजा तोडून सचिन संतोष मिसाळ, किरण संतोष मिसाळ, महेश शंकर मिसाळ, मीनाक्षी महेश मिसाळ, राधिका सचिन मिसाळ, सुनंदा संतोष मिसाळ व योगिता संतोष मिसाळ या सातजणांचा घोळका घरात शिरला. त्यांच्या हातात तलवार, कुऱ्हाड, चॉपर, कोयता यासारखी हत्यारे होती.
या सातजणांनी समोर दिसेल त्याच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. त्यातील संशयित आरोपी सचिन मिसाळ (वय २२) याच्या हातात धारदार तलवार होती. त्या तलवारीने त्याने प्रथम रमेश मिसाळ या ५५ वर्षीय वृद्धावर जोरदार प्रहार केला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रूपेशच्याही पोटात तलवार खुपसण्यात आली.
घरात जोरात आकांत चालू असताना जो तो घराबाहेर पडण्यासाठी समोरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. घरातील कोणीही बाहेर पळून जाऊ नये म्हणून सचिन व त्याच्या सहकाऱ्यांनी मुख्य दरवाजाला आधीच बाहेरून कडी घातली होती.
मृत्यू बनून आलेल्या त्या सातजणांच्या टोळक्याने हाणामारी व हातातील शस्त्राने वार चालूच ठेवले होते. जीव वाचविण्यासाठी रमेश व रूपेश या बापलेकांनी खिडकीतून घराबाहेर उड्या टाकल्या. याचवेळी सचिन, महेश व किरण हे हातातील शस्त्रे घेऊन घराबाहेर आले. सचिनने पाठलाग करून रमेश मिसाळ यांच्यावर पुन्हा जोरदार हल्ला चढविला. त्यांच्या पोटात, पाठीवर, मानेवर, छातीवर जोरदार प्रहार केले. रमेश मिसाळ घरापासून तब्बल २०० फूट पळत गेले. मात्र, शरीरावर तब्बल १९ वार झाले असल्याने ते घरापासून २०० फुटांवर जाऊन (पान ७ वर)
प्रणयाने मुलासाठी
वार हातावर झेलला...
अंगात संशयाचे भूत संचारलेले आरोपी हाणामारी करीत असताना घरात अक्षरश: हलकल्लोळ माजला होता. मिसाळांच्या वंशाचा दिवाही विझवा, असे म्हणत सचिनने तलवार बाहेर काढली. त्या तलवारीने साडेतीन वर्षीय वेदांतवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची आई प्रणयाने सचिनच्या हातातील तलवारीचा वार आपल्या हातावर झेलला आणि जोराचा झटका दिला. त्यात तिचे एक बोट तुटले. मात्र, तिने दाखविलेल्या या धाडसीपणामुळे तिचा मुलगा वेदांत वाचला.
दोघे जखमी,
एक गंभीर
या एकूणच प्रकारात रूपेश आणि प्रफुल्ल यांना मोठ्या जखमा झाल्या आहेत. पोटावर तलवारीचा मोठा वार झाल्याने रूपेशची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातील इतर लोकांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
जमिनीचा वाद हे मुख्य कारण असले, तरी मृत रमेश मिसाळ हे भगतगिरी करतात आणि त्यामुळे सचिन व किरणचे वडील संतोष यांचा मृत्यू झाल्याचा संशय आरोपींना होता. त्यातूनच हे हत्याकांड झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी दिली. याप्रकरणी सचिन मिसाळ, किरण मिसाळ, महेश मिसाळ, मीनाक्षी मिसाळ, राधिका मिसाळ, सुनंदा मिसाळ, योगिता मिसाळ या सातजणांविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०६, ३२४, ४५१, ५०६, ५०४, १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.