संजय पडते शिवसेनेत
By Admin | Updated: February 1, 2015 00:37 IST2015-02-01T00:37:59+5:302015-02-01T00:37:59+5:30
राणेसमर्थक : कुडाळ तालुक्यात काँग्रेसला खिंडार

संजय पडते शिवसेनेत
कुडाळ : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय पडते यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर माजी सरपंच प्रशांत राणे यांच्यासह एका ग्रामपंचायत सदस्याने शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कुडाळ तालुक्यात काँग्रेसला खिंडार पडणार, हे निश्चित झाले आहे.
गेले अनेक दिवस नाराज असलेले संजय पडते व त्यांच्या पत्नी कुडाळच्या सरपंच स्नेहल पडते यांनी नारायण राणेंची साथ सोडत पुन्हा एकदा शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले आहे. त्यांच्यासोबत माजी सरपंच प्रशांत राणे, काँग्रेसचेच ग्रामपंचायत सदस्य नंदू कुंटे व युवक काँग्रेसचे चेतन पडते या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, बेस्टचे अध्यक्ष अरुण दुधवडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, विष्णू कोरगावकर, संदीप राऊळ, नितीन सावंत, मिथुन वजराटकर, आदी उपस्थित होते.
यावेळी संजय पडते म्हणाले, आमची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरुवात झाली असून, नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, येथील नेतृत्वामुळे आमची घुसमट होत होती. त्यामुळे नारायण राणे व काँगे्रसची साथ सोडण्याचा आम्ही विचार केला व जेथून आमची राजकीय कारकीर्द सुरू झाली तेथेच परत जाण्याचा निर्णय घेतला. संजय पडते नाराज असून पक्ष सोडणार, अशी चर्चा गेले काही दिवस जोरदार सुरू होती.
आज, शनिवारी दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश करून या सर्व चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. शिवसेनेत असताना संजय पडते, काका कुडाळकर यांनी
संपूर्ण जिल्ह्यात पक्षाची
घोडदौड केली. मात्र, काका कुडाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे व संजय पडते यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कुडाळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडणार, हे निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)
शहर होणार भगवेमय ?
संजय पडते यांचे कार्यकर्ते जिल्ह्यातील विशेषत: कुडाळ तालुक्यातील गावागावांत आहेत. पडते हे विविध युनियनचे पदाधिकारी असून, कुडाळ शहरातही त्यांचे समर्थक असल्याने कुडाळ शहर हे भगवेमय होणार की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. एकंदरीत पाहता राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते यांच्यासारख्या राणेंच्या खंद्या समर्थकांनी राणेंची साथ सोडल्यामुळे येथील काँगे्रसला मोठा धक्का बसला आहे.