सिंधुदुर्ग - वैभववाडी बाजारपेठेतील वाढलेल्या टप-यांच्या मुद्द्याबाबत सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यामध्ये सर्व टप-या हटविण्याबाबत एकमत झाले असून शनिवारी होणा-या विशेष सभेत कारवाईची रुपरेषा निश्चित केली होईल. त्यानुसार नगरपंचायतीमार्फत कार्यवाही केली जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. वैभववाडी बाजारपेठेतील टप-यांची संख्या गेल्या काही महिन्यात वेगाने वाढली आहे. पार्श्वभूमीवर दोन दिवसांपुर्वी विरोधी नगरसेवक व काही नागरिकांनी विचारणा केली होती. त्यावेळी टप-यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने सर्व नगरसेवकांना नगरपंचायतीत बोलावून चर्चा केली. या चर्चेला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे 16 नगरसेवक उपस्थित होते, असे चव्हाण यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, टप-या काढण्याबाबत सर्व नगरसेवकांचे एकमत झाले असून कारवाईची रुपरेषा ठरविण्यासाठी शनिवारी नगरपंचायतीची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासभेत टप-यांच्या कारवाईबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल, असे संजय चव्हाण यांनी स्पष्ट केले. दत्तमंदिर परिसर आणि शासकीय भूखंड या सार्वजनिक जागांवरील टप-यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर ज्या टप-या लागल्या त्या काढा आणि ग्रामपंचायत काळातील टपरीधारकांचे योग्य पुनर्वसन करा, अशी मागणी शिवसेना, भाजपचे नगरसेवक व नागरिकांनी दोन दिवसांपुर्वी केली होती. त्याच रात्री सार्वजनिक भूखंडावर नवीन स्टाॅल लागला. त्यामुळे वाढणा-या टप-यांचा बाजारपेठेच्या विकासातील संभाव्य अडथळा विचारात घेऊन सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी एकमत केले आहे.
वैभववाडी बाजारपेठेतील टप-यांवर कारवाई करणार : संजय चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 20:33 IST