सांगलीच्या तीन शिकाऱ्यांना पकडले

By Admin | Updated: September 26, 2015 00:17 IST2015-09-26T00:07:16+5:302015-09-26T00:17:48+5:30

जामिनावर सुटका : बंदूक, १३ काडतुसे, दुचाकी जप्त

Sangli's three hunters caught | सांगलीच्या तीन शिकाऱ्यांना पकडले

सांगलीच्या तीन शिकाऱ्यांना पकडले

वैभववाडी : वन्यप्राण्यांच्या बेकायदा शिकारीसाठी फिरणाऱ्या सांगशी-गगनबावडा (जि. कोल्हापूर) येथील तिघांना पोलिसांनी भुईबावड्यानजीक पकडले. त्यांच्या ताब्यातील डबल बोअर बंदूक, १३ जिवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई विभागीय गस्तीवरील पथकाने मध्यरात्री दोनच्या सुमारास केली. त्या तिघांना देवगड न्यायालयात हजर केले असता त्यांना जामिनावर सोडले.वैभववाडीचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे गुरुवारी रात्री विभागीय गस्तीवर होते. त्यांच्यासमवेत सहाय्यक उपनिरीक्षक बी. आर. शिंगाडे, हवालदार राजेंद्र नानचे, बी. एस. चिले, आदी पोलिसांचे पथक होते. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास या पथकाला भुईबावड्यानजीकच्या हेत खिंडीत एका दुचाकीवरून फिरणारे तिघे आढळून आले. त्यांना थांबवून चौकशी करताना त्यांच्याजवळ डबल बोअर काडतूस बंदूक, १३ जिवंत काडतुसे सापडली. त्यामुळे त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सुनील शंकर पडवळ (वय ४०), सागर भगवान पडवळ (१९) व अक्षय नारायण पडवळ (२०, सर्व रा. सांगशी-गगनबावडा) अशी त्यांची नावे आहेत. आपण शिकारीसाठी भुईबावडा घाटमार्गे आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या ताब्यातील दुचाकीची (क्रमांक - एम एच ०९ ; सी टी २५३३) कागदपत्रेही यांच्याजवळ नव्हती. त्यामुळे बंदूक, १३ जिवंत काडतुसे आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
तिघांना अटक करून देवगड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले. गेल्या वर्षभरात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्यांवर झालेली ही दुसरी कारवाई आहे. या कारवाईमुळे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sangli's three hunters caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.