वाळू माफिया अधिकाऱ्यांवर शिरजोर
By Admin | Updated: July 30, 2014 22:58 IST2014-07-30T22:55:24+5:302014-07-30T22:58:15+5:30
कांदळवनही भक्ष्यस्थानी : आरोंदा येथे भर पावसात वाळू उत्खनन

वाळू माफिया अधिकाऱ्यांवर शिरजोर
सुभाष परूळेकर ल्ल मळेवाड
आरोंदा किरणपाणी भागात किनाऱ्यालगत गेले आठ दिवस वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन भर पावसाळ्यात आणि अधिकाऱ्यांच्या देखत सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या उत्खननावर स्थानिक महसूल विभागाचे नियंत्रण नसल्याने गोव्यातील वाळू व्यावसायिक आरोंदा खाडी आंदण दिल्यासारखे वागत आहेत. यातील बहुतांशी उत्खनन हे कांदळवन परिसरात असून वनविभागही याकडे दुर्लक्ष करीत आहे.
आरोंदा भागात गेली कित्येक वर्षे बेकायदा वाळू उत्खनन सुरू आहे. अनेकवेळा गोव्यातील वाळू व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. तर प्रशासनाच्या अनेक कारवाया स्थानिक महसूल प्रशासनामुळे फसल्या आहेत. स्थानिक मंडळ अधिकारी तसेच तलाठी कोतवाल यांचे या वाळू व्यावसायिकांशी लागेबंधे असल्याने अनेकवेळा कारवाई करायच्यावेळी ते निसटल्याचे दिसून आले आहे.
आतापर्यंत या खाडीत कोट्यवधीची वाळू उत्खनन करून नेण्यात आली आहे. मात्र, महसूल विभागाला यातील कवडीमोलाचा महसुलही देण्यात आला नाही. अनेकवेळा या व्यावसायिकांवर कारवाई करायची झाली की, गोवा व महाराष्ट्राच्या समुद्री हद्दीचा प्रश्न ऐरणीवर येतो.
याचाच फायदा या व्यवसायिकांना मिळून ते निसटण्यात यशस्वी झाले आहेत. या वाळू व्यावसायिकांनी आतापर्यंत काढलेल्या वाळूमुळे समुद्रात करण्यात आलेल्या बांधकामानाही याचा फटका बसू लागला आहे.