कार्यकर्त्यांच्या उरातही ‘धकधक’
By Admin | Updated: October 17, 2014 22:13 IST2014-10-17T21:54:30+5:302014-10-17T22:13:31+5:30
लढत अटीतटीची : ‘सामंत की माने’ राजकीय गणित सुटेना---रत्नागिरी

कार्यकर्त्यांच्या उरातही ‘धकधक’
प्रकाश वराडकर - रत्नागिरी -रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी काय गूल खिलविणार, याबाबत सर्वांच्याच मनात ‘धकधक’ सुरू आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले उदय सामंत आपली आमदारकी तिसऱ्यांदा राखणार की, मोदी लाटेवर स्वार होत भाजपाचे बाळ माने विजयश्री खेचणार, याबाबतची राजकीय गणिते मांडण्यात सर्वजण गर्क आहेत. मतदानाआधी इकडे पॅक, तिकडे पॅक सांगणारेच आता या वाडीने फसविले, त्या वाडीने दगा दिला, असे सांगत असल्याने आधीच्या हिशेबात धरलेले ‘हातचे’ कमी झाले आहेत. घसरलेल्या टक्क्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या उरातही धडकी भरली आहे. सामंत-माने गणित सुटता सुटत नसल्याने ‘१९ ला पाहू’ असे सांगत अनेकांनी हे गणित सोडविणेच बंद केले आहे.
रत्नागिरी मतदारसंघात १५ आॅक्टोबरला अत्यंत शांततेत मतदान झाले. मतदारसंघात यावेळी २ लाख ६५ हजार २०१ एवढी मतदारसंख्या होती. निवडणुकीतील चुरस पाहता त्यातील किमान ७० टक्के मतदान होईल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात ६४.६१ टक्के एवढेच मतदान झाले. २००९ मधील मतदान टक्केवारीच्या तुलनेत यावेळी मतदानात एक टक्का घसरला आहे. त्यातही यावेळी मतदारांची संख्या या मतदारसंघात ४४०० एवढी वाढली आहे. त्यामुळे घसरलेली टक्केवारी ही अधिक आहे. याचाच अर्थ एखाद्या पक्षाच्या मतदारांनी मतदानात भागच घेतला नाही, असा असू शकतो किंवा राजकीय उदासिनतेपोटी काहींनी मतदानच केले नसावे, असाही त्याचा अर्थ असावा, अशी चर्चा रंगली आहे.
मतदानोत्तर स्थितीचा आढावा मतदारसंघातील काही जाणकारांकडून, कार्यकर्त्यांकडून घेतल्यानंतर त्यातून अनेक राजकीय कोड्यांचा उलगडा होताना दिसून येत आहे. रात्रीत काही वाड्या दुसऱ्या उमेदवाराच्या बाजूने फिरल्याची चर्चाही होत आहे. ज्या भागावर काही उमेदवारांची मदार होती तेथील मतदार व कार्यकर्त्यांनी त्यांना तोंडघशी पाडल्याच्या सुरस कथा आता रंगत आहेत. जयगड विभागात व रत्नागिरी शहरात भाजपाची स्थिती चांगली असल्याचा जाणकारांचा होरा आहे, तर नाचणे विभागासह ग्रामीण भागात सेनेची स्थिती भक्कम असल्याचा व शहराचा बॅकलॉग भरून काढण्याइतपत मतदान सेनेला झाल्याचा दावाही केला जात आहे.
मतदारसंघात एकूण ९ जिल्हा परिषद गट असून, त्यामध्ये शिवसेनेचे चांगले वर्चस्व आहे. शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांच्यासाठी शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केल्याने सामंत यांचा विजय निश्चित असल्याचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचे मत आहे. आधी हो म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी रात्रीत दगा दिल्याची चर्चाही रंगली आहे. दुसरीकडे भाजपा कार्यकर्तेही ठामपणे मानेच निवडून येणार असल्याचे सांगत आहेत. या निवडणुकीत भाजपाबरोबर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही छुपी युती केली होती. त्यांची मतेही भाजपाकडे वळल्याची चर्चा आहे.
शहर ठरणार निर्णायक!
रत्नागिरी शहरात लोकसभा निवडणुकीच्या वेळी ३२ हजार मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत त्यात ५ हजारांनी वाढ झाली असून, यावेळी शहरात एकूण ३७ हजार मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेली ही मते भाजपासाठी संघाची असल्याचीही चर्चा आहे. जे मतदार सहसा मतदानासाठी बाहेर पडत नाहीत, त्यांचीच ही मते असल्याच्या चर्चेने राजकीय गणित गुंतागुंतीचे बनले आहे. त्यातच यावेळी संघाने केलेल्या जोरकस प्रचारामुळे शहरात बाळ माने यांना ६ ते ७ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा भाजपा नेत्यांचाच दावा आहे. त्यामुळे शहरातील मतदान हे निकालात निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
‘फॉर्च्युन’ कोणाला लाभणार?
रत्नागिरी मतदारसंघातील या चौरंगी निवडणुकीत विजयासाठी सर्वच उमेदवारांनी नेट लावला असला तरी त्याचा लाभ कोणत्या उमेदवाला होणार, कोणत्या उमेवाराचे ‘फॉर्च्युन’ यावेळी वेगात असेल? विजयाचे ‘फॉर्च्युन’ कोणाला लाभणार, असे अनेक प्रश्न मतदारांमध्ये चर्चिले जात आहेत. त्याचे उत्तर मात्र १९ आॅक्टोबरलाच मिळणार आहे.