खारे पाणी शेतीत घुसले

By Admin | Updated: December 28, 2014 00:11 IST2014-12-28T00:06:51+5:302014-12-28T00:11:50+5:30

पाल-गोडवणेवाडीतील शेतकऱ्यांचे नुकसान

Saltwater enters the field | खारे पाणी शेतीत घुसले

खारे पाणी शेतीत घुसले

वेंगुर्ले : पाल-गोडवणेवाडी येथील खारलॅण्ड बंधाऱ्याच्या मोरीला फळ्या नसल्यामुळे खारे पाणी शेतीत घुसून सुमारे १५ ते २० एकर वायंगणी भातशेती, पाच एकर माड बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पिण्याचे पाणीही खराब झाले आहे. याबाबत वेळोवेळी संंबंधित विभागास लेखी तक्रारी करूनही कोणतीच कारवाई न केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करून ढासळलेले बंधारे व मोऱ्यांची डागडुजी करावी, अशी मागणी खारलॅण्ड उपविभाग वेंगुर्ले यांच्याकडे पाल ग्रामपंचायतीने ठराव करून केली आहे.
पाल-गोडवणेवाडी येथून मोचेमाड खाडी जात असून खारे पाणी शेत जमिनीत व माड बागायतीत येऊ नये, यासाठी शासनाच्या खारलॅण्ड विभागाने तुळस ते आसोली हद्दीपर्यंत धूपप्रतिबंधक बंधारे व ठिकठिकाणी मोऱ्या बांधल्या आहेत. या बंधाऱ्यांना सुमारे २५ वर्षे उलटून गेली असून याकडे गेल्या पंचवीस वर्षात खारलॅण्ड विभागाने देखभाल दुरुस्तीची कामेच केली नाहीत. त्यामुळे नदीकडेने असलेले बंधारे ढासळल्याने तसेच मोरी लिकेज झाल्याने खारे पाणी भातशेतीत, माड बागायतीत घुसून शेती व बागायती नापीक झाली आहे. यामुळे स्थानिक लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जवळील पिण्याचे पाणीही खराब झाले आहे.
धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून वेळोवेळी लेखी निवेदनेही दिली होती. परंतु याकडे खारलॅण्ड विभागाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्वरीत डागडुजी करावी, अशी मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने वेंगुर्ले खारलॅण्ड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी पाल-गोडवणेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Saltwater enters the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.