देवगडात बनावट संजिवनीची विक्री

By Admin | Updated: August 1, 2014 23:17 IST2014-08-01T21:12:06+5:302014-08-01T23:17:25+5:30

आंबा कलमांसाठी वापर : कृषी विभागाचे दुर्लक्ष

Sales of fake Sanjivani in Devgad | देवगडात बनावट संजिवनीची विक्री

देवगडात बनावट संजिवनीची विक्री

पुरळ : आंबा कलमांना लवकर मोहोर येण्यासाठी कल्टार ही संजीवनी जुलै व आॅगस्ट महिन्यांमध्ये वापरली जाते. देवगड तालुक्यामध्ये कल्टार, बोल्टार, सेल्टार, थ्रीस्टार, एक्सस्टार, पॅक्लोजस्टार या संजीवनी वापरल्या जात असून बऱ्याच प्रमाणात परजिल्ह्यातील एजंट घरोघरी जाऊन व काही एजंटांमार्फत बनावट संजीवनी विक्री करीत आहेत. याकडे देवगड कृषी विभाग दुर्लक्ष करीत असून बनावट संजीवनी विक्रेत्यांना एकप्रकारची चालनाच देत आहे.
बनावट रासायनिक खते व सेंद्रीय खते, बनावट भात बियाणे, बनावट किटकनाशके याचबरोबर आता बनावट कल्टार या संजीवनीची विक्री केली जात आहे. विशेषत: बोल्टार, थ्रीस्टार या कंपन्यांची जशीच्या तशी छपाई व बाटलीचा आकार बनावट कंपन्या करून या संजीवनी विकल्या जात आहेत. तालुक्यामध्ये पंधरा वर्षापूर्वी कल्टार या कंपनीचे संजीवनी वापरायचे. यानंतर अनेक कल्टार संजीवन्या बाजारामध्ये आल्या आहेत. परजिल्ह्यातील एजंट हे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बनावट कल्टार संजीवनी शेतकऱ्यांना खरेदी करण्यास प्रवृत्त करून माफक दरात म्हणजेच बाटलीवरील छपाई किंमतीच्या निम्मे किंमतीने विक्री करीत आहेत. युरोपियन राष्ट्रांमध्ये हापूस आंब्याला जी बंदी घालण्यात आली आहे. त्या बंदीला बनावट कल्टार हेही एक कारण असू शकते. कारण नको असलेले घटक आंबा कलमांना मिळत असतील आणि यामुळे कलमांचा समतोलपणा बिघडून त्याचा परिणाम फळांवर होत आहे. आंबा कलमांना बनावट खते, किटकनाशके याबरोबर कल्टार या संजीवनीचा वापर होत राहिल्याने भविष्यामध्ये देवगड हापूस पिकांवर विपरीत परिणाम होऊन देवगड हापूस आंब्याची पत घसरून आंबा पीकही धोक्यात येऊ शकते. कृषी विभाग मात्र आपले कार्य पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून एखाद्या वार्षिकाप्रमाणे मेळावे घेऊन आपले कार्य पार पाडत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी कोणीही करीत नसल्याने येथील शेतकरी एकाएकी पडला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने तेथील लोकप्रतिनिधी नेहमीच उभे असतात. विधानसभा लोकसभेमध्ये आवाज उठवतात. मात्र, आंबा बागायतदारांच्या बाजूने कुठलाही लोकप्रतिनिधी नसल्याने या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बनावट या नावाने बागायतदारांना ग्रासले आहे. तर दलालांच्या मक्तेदारीने आंबा बागायतदार होरपळले आहेत. यामुळे आंबा बागायतदार पूर्णत: कोलमडून गेला आहे. (वार्ताहर)

Web Title: Sales of fake Sanjivani in Devgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.