सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४३ अर्जांची विक्री
By Admin | Updated: September 23, 2014 23:55 IST2014-09-23T23:47:00+5:302014-09-23T23:55:05+5:30
कुडाळमधून दहा, सावंतवाडी मतदारसंघातून ११ आणि कणकवली मतदारसंघातून २२ अर्ज आतापर्यंत विक्रीस गेले आहेत. बसपच्या जळगाव येथील एका कार्यकर्त्यानेही उमेदवारी अर्ज घेतला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४३ अर्जांची विक्री
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत मिळून आज, मंगळवारपर्यंत एकूण ४३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस होता. अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारपर्यंत आणखी तीन दिवसांचा कालावधी आहे.
कुडाळमधून दहा, सावंतवाडी मतदारसंघातून ११ आणि कणकवली मतदारसंघातून २२ अर्ज आतापर्यंत विक्रीस गेले आहेत. बसपच्या जळगाव येथील एका कार्यकर्त्यानेही उमेदवारी अर्ज घेतला आहे. कुडाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी चार, शिवसेनेचे वैभव नाईक आणि राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत यांनी प्रत्येकी एक, बसपच्या जळगाव येथील नरेंद्र कुमार, मदनलाल खैरनार यांनी प्रत्येकी एक, तसेच बसपचेच जिल्हाध्यक्ष रवींद्र कसालकर यांनी एक, अपक्ष म्हणून देऊ विठ्ठल तांडेल (आडवली-मालवण) यांनी एक आणि स्नेहा केरकर (तारकर्ली) यांनी एक उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडून घेतला आहे.
सावंतवाडीतून लढण्यासाठी दहाजणांनी अर्ज खरेदी केले असून, यात मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, काँग्रेसचे सेवादल अध्यक्ष वसंत केसरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप टोपले, अपक्ष नारायण सावंत, साटेली-भेडशी येथील किशोर लोंढे, हिंदू महासभेचे अजिंक्य गावडे यांनी तीन अर्ज खरेदी केले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी आज चार उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली.
शनिवारी भाजपच्यावतीने व शिवराज्य पक्षाच्यावतीने प्रत्येकी चार अर्ज घेण्यात आले होते. काल, सोमवारी नीतेश राणे यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी दहा अर्ज घेतले होते, तर आज शैलेंद्र नेरकर (मनसे), संदीप भिवा कदम (भारिप), डॉ. अभिनंदन मालंडकर (राष्ट्रवादी) व प्रवीण अनंत पारकर (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक अर्ज घेतला आहे. मात्र, अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. (प्रतिनिधी)