साहिल कालसेकर अखेर गजाआड चिपळूण पोलिसांची कामगिरी
By Admin | Updated: July 30, 2015 00:05 IST2015-07-30T00:05:20+5:302015-07-30T00:05:20+5:30
तिसऱ्या आरोपीला पकडून हॅट्ट्रिक साधली आहे

साहिल कालसेकर अखेर गजाआड चिपळूण पोलिसांची कामगिरी
चिपळूण : कुख्यात गुंड साहिल कालसेकर याला रात्री दीडच्या दरम्यान चिपळूण पोलिसांनी देवरूख येथे सापळा लावून पकडले. पळून गेल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याच्याकडून चाकू व दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. चिपळूण पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पळालेल्या तिसऱ्या आरोपीला पकडून हॅट्ट्रिक साधली आहे.रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साहिल अजमल कालसेकर या कुख्यात गुंडाने बुधवारी (दि. १५ जून) रुग्णालयातून पलायन केले होते. याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, साहिलला शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेची सूत्रे त्यांनी चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्याकडे दिली होती. त्यानुसार मकेश्वर यांनी पाठलाग सुरू केला होता.जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर साहिल बेलबाग येथे गेला. त्यानंतर दोन दिवस त्याचा मुक्काम रत्नागिरी येथे होता. तेथून तो मुंबईला गेला. परत देवरूख येथे आला व पुन्हा मुंबई येथे गेला होता. मुंबईहून परत तो देवरूख येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. साहिलच्या पाठीवर असलेल्या पोलीस निरीक्षक मकेश्वर यांना साहिलची माहिती मिळत होती; परंतु तो सतत मोबाईलचे सीमकार्ड बदलत होता. त्याची ठिकाणे सतत बदलत होती. एखाद्या ठिकाणावर पोलीस पोहोचले की, तो तेथून गायब असायचा.
देवरूख येथील गिरीराज हॉटेलजवळ साहिल येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलीस निरीक्षक मकेश्वर, सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, हवालदार अमोल यादव, गगनेश पटेकर, उमेश भागवत, संदीप नाईक, राजेश चव्हाण, राजू गाडीवट्ट, विजय खामकर व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे रमीज शेख यांनी सापळा रचला होता. (पान ८वर)
(पान १ वरुन) या कामगिरीत मकेश्वर यांना रमीज शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय अनेक नागरिकांनीही त्यांना हस्ते परहस्ते मदत केली. रात्री १.३०च्या सुमारास हॉटेल गिरीराजजवळ साहिल मोबाईलवर बोलत होता.
या दरम्यान टेम्पो ट्रॅव्हलरमधून साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी त्याला घेरले व शरण येण्यास सांगितले. परंतु, सातत्याने पोलिसांवर हल्ला करण्याची सवय असलेल्या साहिलने नेहमीप्रमाणे पोलिसांच्या दिशेने चाकू भिरकावला. सुदैवाने तो चाकू कोणाला लागला नाही आणि पोलिसांनी साहिलला रंगेहाथ पकडले. रात्रीच त्याला चिपळूण येथे आणण्यात आले.
साहिलकडून चाकू व दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. साहिलला पकडण्यासाठी पोलिसांनी स्थानिक पातळीवर घरझडत्या घेतल्या. मुंबईतील डोंगरी, दादर, मिरारोड, ठाणे येथेही शोध घेतला. परंतु, तो सापडत नव्हता. दरम्यान, काही काळ तो मार्गताम्हाणे व पनवेल परिसरात काहींना आढळला होता. १५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर साहिल पोलिसांच्या हाती सापडला. साहिलला अटक झाल्याचे समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे जिल्हाभरातून कौतुक करण्यात आले.
साहिलला दुपारी पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी स्वत: रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)
पोलिसांना चकविण्यासाठी बदलला लूक
रत्नागिरी ते मुंबई, मुंबई ते देवरूख असा प्रवास करताना साहिल पनवेल, मुंबके व मार्गताम्हाणे येथेही गेला होता. खेड, सावर्डे मोहल्ला व संगमेश्वर परिसरात या काळात चोरीला गेलेल्या मोटारसायकलीही त्यानेच चोरल्या असाव्यात. मुंबकेहून दुचाकीने तो सावर्डे येथे आला. तेथे पेट्रोल संपल्याने ती गाडी तेथेच सोडून दुसरी दुचाकी घेऊन तो देवरूखकडे गेला होता. साहिलने आपला नेहमीचा लूकही बदलला आहे.