सावंतवाडी जिल्ह्यात देखाव्यातून समाज प्रबोधन

By Admin | Updated: September 5, 2014 23:25 IST2014-09-05T21:57:00+5:302014-09-05T23:25:17+5:30

गणेशोत्सवात नवा ट्रेंड : खर्चिक बाबींमुळे अनुदान, स्पर्धांची गरज

Sagar Prabodhan in Sawantwadi district | सावंतवाडी जिल्ह्यात देखाव्यातून समाज प्रबोधन

सावंतवाडी जिल्ह्यात देखाव्यातून समाज प्रबोधन

अजय लाड - सावंतवाडी जिल्ह्यात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. त्याठिकाणी भाविकांकरिता पौराणिक अथवा जागृतीकरिता चलचित्रांचे देखावे बनविले जातात. त्याप्रमाणे काही हौशी भाविकांकडून घरगुती गणेशोत्सवात देखावे मांडण्यात येतात. त्यातून गावातील लोकांमध्ये प्रबोधन केले जाते. मात्र, अशा भाविकांना प्रोत्साहन देण्याकरिता मोठ्या प्रमाणात स्पर्धांची गरज आहे. अथवा शासनाकडूनही अशा देखाव्याकरिता काही प्रमाणात अनुदान दिले गेल्यास जनतेच्या प्रबोधनासाठी देखाव्यांचा माध्यम म्हणून वापर केला जाऊ शकतो.
जिल्ह्यात गणेश उत्सवाचा उत्साह हा भाविकांना प्रेरणा देणारा तसेच नवसंजीवनी देणारा ठरणारा असतो. या गणेशोत्सवात विविध प्रकारची आरास केली जात असते. यासाठी चाकरमान्यांसह साऱ्यांचीच धावपळ उडालेली असते. गणपतीची आरास कशी करावी, याबाबतही वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधल्या जातात. याच गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम असते. सार्वजनिक गणेशोत्सवात उत्सवमूर्तीनजिक दरवर्षी चलचित्र देखावे बनविले जातात. यात जास्त देखावे हे पौराणिक कथांवर आधारित असतात. इतिहासाची ओळख सध्याच्या पिढीला व्हावी, या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दरबारात चलचित्रीत देखावे बनविले जातात. गणेश उत्सव हा सर्वांना एकत्र आणणारा असतो. यात गणेश पूजनाच्या निमित्ताने घरातील विविध ठिकाणी नोकरी धंद्याकरिता गेलेल्या व्यक्तीही सुट्टी काढून गणपतीसाठी मूळ घरी दाखल होतात. यामुळे घरातील एकताही टिकून राहते.
गावागावातही गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी दाखल होतात. गावातील लोकांमध्ये गणेशाच्या दर्शनाकरिता एकमेकांच्या घरी येण्याजाण्याचा प्रघात आहे. गावात कितीही वाद असले तरिही गणेशोत्सवात या वादांनाही दूर लोटले जाते. आणि गावातील घरगुती गणेशोत्सवात केल्या जाणाऱ्या आरासमध्ये काही हौशी देखावेही तयार करतात. काही देखावे स्थिर असतात तर काही हलते. गावातील देखाव्यात जास्त करुन पौराणिक कथांवर आधारित संहिता वापरुन देखाव्यांची चित्रे तयार केली जातात. आणि ती पाहण्यासाठीही पाहुण्यांसह गावागावातून मित्रमंडळींसह अन्य लोकांचीही गर्दी होत असते.
देखाव्यांचा खर्च जनसामान्यांच्या हाताबाहेरचा
गणेशोत्सवात केल्या जाणाऱ्या देखाव्यांचा खर्च हा सर्वांनाच परवडणारा नसतो. यामुळे देखावे करुन जागृती करावयाची इच्छा असणाऱ्यांना देखाव्यांचा खर्च न परवडल्याने देखावे केले जात नाहीत. यासाठी शासनातर्फे अशा कलाकारांना शासन योजनांच्या प्रसिध्दीसाठी अनुदान मिळाले पाहिजे. गणेशोत्सवातील देखावा स्पर्धांमध्येही वाढ होणे गरजेचे आहेत. जिल्ह्यात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या संस्थाच देखाव्यांच्या स्पर्धा भरवतात. त्यांच्यातही वाढ झाली पाहिजे.

चर्चासत्राचे आयोजन करावे
गणेशोत्सव कालावधीत करण्यात येणाऱ्या देखाव्याचा वापर आतापर्यंत पौराणिक कथांमधील सार जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला जात असतो. मात्र, शासनाच्यावतीने प्रयत्न केला गेल्यास नागरिकांकरिता शासनाच्या विविध योजना आणण्यात मदत होईल.

शासनातर्फे योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता मेळावे, चर्चासत्रे, बैठका, जनजागृती फेरी, पथनाट्य आदींचा वापर केला जातो.

Web Title: Sagar Prabodhan in Sawantwadi district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.