नवदुर्गांच्या दर्शनाबरोबर सागर दर्शनही!
By Admin | Updated: October 5, 2015 00:06 IST2015-10-04T22:00:29+5:302015-10-05T00:06:53+5:30
प्रांताधिकारी यांची संकल्पना : प्रगत राजापूर, माय राजापूरचा सहभाग

नवदुर्गांच्या दर्शनाबरोबर सागर दर्शनही!
राजापूर : राजापूर तालुक्यातील पर्यटनाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन त्यासाठी आग्रही असलेल्या प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या संकल्पनेला ‘प्रगत राजापूर संघटना’ आणि त्याअंतर्गत निसर्ग पर्यटनासाठी कार्यरत असलेल्या ‘माय राजापूर’ या सेलने आपल्या सहकार्याची जोड दिली आहे.
या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून येत्या नवरात्रोत्सवात १३ ते २१ आॅक्टोबर या कालावधीत राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध ‘नवदुर्गा दर्शन सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनाच्या व्यावसायिक दृष्टीने पिछाडीवर असलेल्या राजापूर तालुक्याला जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर आणून येथील धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाची ओळख व्हावी याचा प्रारंभ म्हणून ‘नवदुर्गा दर्शन सोहळ्या’चा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
रत्नागिरी, राजापूर आणि आडिवरे अशा तीन ठिकाणांहून या सहलीच्या बसेस सुटणार आहेत. श्री महाकाली - आडिवरे, श्री आर्यादुर्गा - कशेळी, श्री जाकादेवी - कशेळी, श्री कालिकादेवी - वेत्ये, श्री नवलादेवी - नाटे, श्री भरतदुर्गादेवी - होळी, श्री भगवती देवी - माडबन, श्री मुहुर्तादेवी - मिठगवाणे आणि श्री कात्रादेवी - सागवे अशा नऊ देवींचे दर्शन या सहलीतून घेता येणार आहे. कशेळी ते कात्रादेवी या सागरी महामार्गावरून सागर दर्शनही करता येणार आहे. वीस महिला भाविकांच्या एका सहलीत लकी ड्रॉ पध्दतीने एका महिलेला देवीची मानाची साडी भेट देण्यात येणार आहे.
प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मूळ संकल्पनेला आमदार राजन साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे, माजी आमदार गणपत कदम यांचे सहकार्य लाभले आहे. प्रगत राजापूर संघटनेचे अॅड. शशिकांत सुतार, महेश शिवलकर, उल्हास खडपे, संजय मांडवकर, धनंजय मराठे, अरविंद पारकर तसेच रत्नागिरीतील सुधीर रिसबूड यांनी हा उपक्रम आखला असून, माय राजापूरचे जगदीश पवार आणि प्रदीप कोळेकर यांनी संकल्पना विस्तार केला आहे. या सहलींत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी रत्नागिरी येथे पॉश ट्रॅव्हल्स, आडिवरे येथे गणेश रानडे तसेच राजापूर येथे उल्हास खडपे व संजय मांडवकर यांच्याशी संपर्क साधावा व नवदुर्गा दर्शनाचा लाभ घ्यावा. (प्रतिनिधी)
पर्यटनाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न.
राजापूर तालुक्यातील नवदुर्गांचे दर्शन देण्याची योजना.
राजापूर पर्यटनाच्या व्यावसायिक दृष्टीने पिछाडीवर.
वीस महिला भाविकांना देवीच्या मानाच्या साडीची भेट़