सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा फडकला

By Admin | Updated: October 19, 2014 22:25 IST2014-10-19T22:12:35+5:302014-10-19T22:25:44+5:30

नारायण राणेंचा पराभव : शिवसेनेचे वैभव नाईक, दीपक केसरकर तर काँग्रेसचे नीतेश राणे विजयी

The saffron flag in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा फडकला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा फडकला

सिंधुदुर्गनगरी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रचारप्रमुख तथा माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांना शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी तब्बल १० हजार ३७६ मतांनी पराभूत केले. १९९० पासून २०१४ पर्यंत सलग २५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राजकीयदृष्ट्या वर्चस्व गाजविणाऱ्या राणे यांना विजयात सातत्य राखण्यापासून नाईक यांनी रोखले आहे. वैभव नाईक यांना ७० हजार ५८२ तर नारायण राणे यांना ६० हजार २०६ मते मिळाली. तर सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांनी आपल्या सर्व विरोधकांना धूळ चारत तब्बल ४१ हजार १९२ मतांनी विजय मिळवत ही सावंतवाडीची जागाही शिवसेनेकडे खेचून आणली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ वर्षानंतर पुन्हा दोन आमदार आल्याने सिंधुदुर्गात भगवा डौलाने फडकला आहे.
एकीकडे सावंतवाडी आणि कुडाळमध्ये शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखले असले तरी कणकवली मतदारसंघात भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांचा २५ हजार ९७९ एवढ्या मोठ्या मताधिक्याने काँगे्रसच्या नीतेश राणे यांनी पराभव करीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसतर्फे एकमेव आमदार होण्याची संधी मिळवली आहे.
१९९० पासून सलग सहावेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेल्या नारायण राणे यांची विजयी घोडदौड शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी रोखली आहे. या पराभवानंतर नारायण राणे आता राजकारणात कोणती भूमिका घेतात? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कासार्डे येथे प्रचार सभा होऊनदेखील भाजपाचे एकमेव आमदार असलेल्या प्रमोद जठार यांचा पराभव झाल्याने सिंधुदुर्गात मोदी लाटेचा कोणताही प्रभाव दिसून आला नाही. मतदारसंघ एकत्रित असताना युतीची राजवट वगळता देवगड मतदारसंघ कायमच विरोधी पक्षात राहिला होता. या निवडणुकीतदेखील कणकवली मतदारसंघ पर्यायाने देवगड तालुका काँग्रेसच्या रूपाने विरोधी पक्षात राहणार आहे. मात्र, नारायण राणे यांना विरोध म्हणून कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघाने शिवसेनेच्या पदरी घवघवीत यश टाकले आहे.
त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांपैकी दोन जागा शिवसेना तर एक जागा काँग्रेसकडे आली आहे. गत निवडणुकीप्रमाणेच तीनपैकी एका जागेवरच काँग्रेसला समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे नारायण राणेंची राजकीय इनिंग संपून नीतेश राणेंच्या इनिंगला सुरूवात झाली आहे. (प्रतिनिधी)
कोणत्या कारणामुळे
पक्ष जिंकला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थ साथीमुळे वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांनी कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघात कार्यकर्त्यांना हाताशी धरून घवघवीत यश संपादन केले.

नारायण राणे यांना विरोध तसेच काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांबाबतची नाराजी, जनसंपर्क कमी ठेऊन ग्रामीण भागात विकासकामांबाबत असलेल्या नाराजीचा फटका काँग्रेसला या निवडणुकीत बसल्याने नारायण राणेंसारख्या नेत्याचा पराभव झाला.

वैभव नाईक यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. तसेच विविध आंदोलनांद्वारे आघाडी सरकारबाबत लोकांच्या मनात असलेल्या खदखदीला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ते या खेळीत यशस्वी झाले.

ठळक वैशिष्ट्ये
राज्याचे माजी उद्योगमंत्री नारायण राणे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभूत झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासार्डे येथे प्रचारसभा घेऊनही प्रमोद जठार निवडून येऊ शकले नाहीत.

दीपक केसरकर यांनी सर्व विरोधी उमेदवारांना पराभवाची धूळ चारत तब्बल ४१ हजार १९२ मतांनी विजय संपादन केला.

Web Title: The saffron flag in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.