‘सौभाग्यवती सुंदरी’चा मान श्रद्धा सातार्डेकरला
By Admin | Updated: November 25, 2014 23:46 IST2014-11-25T22:36:11+5:302014-11-25T23:46:33+5:30
बांदा येथील स्पर्धा : क्रिएटिव्ह सखी गु्रपच्यावतीने आयोजन

‘सौभाग्यवती सुंदरी’चा मान श्रद्धा सातार्डेकरला
बांदा : आकर्षक व भव्य रंगमंच, झगमगती प्रकाश योजना, सौदर्यवतींनाही लाजविणारे सौभाग्यवतींचे आकर्षक पदन्यास, संगीताचा लयबद्ध ठेका, रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या स्पर्धेत महिला प्रेक्षकांचाही तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद अशा वातावरणात बांदा येथील विठ्ठल रखुमाई सभागृहात पार पडलेल्या ‘सौभाग्यवती सुंदरी २0१४’ चा बहुमान येथील श्रध्दा समीर सातार्डेकर यांनी पटकावला.
येथील गांधी चौक महिला मंडळ व क्रिएटिव्ह सखी गु्रपच्यावतीने विवाहित महिलांसाठी सौभाग्यवती सुंदरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत एकूण १४ सौभाग्यवती सहभागी झाल्या. विजेत्या श्रध्दा समीर सातार्डेकर यांना रोख पारितोषिक व मानाचा मुकुट देण्यात आला.
रश्मी कुबडे व अर्चना साळगावकर यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविला. उत्कृष्ट केशभूषा सोनाली राणे, उत्कृष्ट वेशभूषा सौ. रेश्मा राजगुरु, उत्कृष्ट स्माईल अमृता महाजन, उत्कृष्ट फोटोजेनिक अनुजा देसाई, उत्कृष्ट पदन्यास प्रियंका धारगळकर या सांैदर्यवती सौभाग्यवतींची निवड करण्यात आली.
स्पर्धेच्या एकूण दोन फेऱ्या झाल्या. पहिली फेरी शैलीदार चाल व स्वत:ची ओळख यावर आधारीत झाली. या फेरीत स्पर्धकांनी आपली ओळख सांगितली. दुसरी फेरी परीक्षकांच्या प्रश्नोत्तरावर आधारीत झाली. या फेरीत मात्र काही सौभाग्यवतींनी परीक्षकांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
‘आविष्कार तारकांचा’ या कार्यक्रमाअंतर्गत महिलांनी समूह नृत्य, गीत गायन, कोळी नृत्य, भुपाळी तसेच मराठी हिंदी गीतांवर नृत्य सादर केली. रुपाली शिरसाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत शेवटपर्यंत कायम ठेवली. परीक्षक म्हणून डॉ. मीना जोशी, सुचिता काणेकर व दीपा कुबडे यांनी काम पाहिले.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवलीच्या नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, उपसरपंच प्रियांका नाईक, मंडळाच्या अध्यक्षा अंकिता स्वार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत अंकिता स्वार यांनी केले.
यावेळी रिया वाळके, वंदना पावसकर, साधना पांगम, जयश्री गोवेकर, श्रीया गोवेकर, श्रृती गोवेकर, उज्ज्वला महाजन, मेघा महाजन, सिध्दी पावसकर, प्रियंका नाटेकर, नीता नाटेकर, अमिता स्वार, श्वेता येडवे, माधुरी पावसकर, चित्रा भिसे, इशा पांगम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)