सावंतवाडी : सावंतवाडी मतदार संघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आता भाषा मंत्री असल्याने सावंतवाडीत येऊन ते गजाली सांगून निघून जात आहेत. त्यामुळे आता ते पाहुणे बनले असल्याने जनतेची घोर फसवणूक सुरू असल्याची टीका ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली.राऊळ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी विमानाने गोवा येथे येऊन खोके आहेत का बघितले. तेथून सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेऊन जुनाट प्रश्नांचे पुन्हा गाजर दाखवून निघून गेले. मतदार संघातील नागरिकांना भेटत नाहीत. तसेच भेटायला गेल्यावर मला वेळ नाही असे सांगून लोकांची हेटाळणी करतात, हे दुर्दैव आहे. आंबोली,गेळे व चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्नावर केसरकर लोकांची आणखी किती काळ फसवणूक करणार आहेत. या जमीन वाटप प्रश्नावर भूलभुलैया करत केसरकर तीन वेळा आमदार झाले. जवळपास ते चाळीस वर्षे हा प्रश्न हाताळत आहेत. तरीही तो सुटत नाही. आणि घोषणा करण्या पलीकडे काही केलं नाही. सावंतवाडी शहरातील मल्टिस्पेशालीटी हाॅस्पीटल जमीन प्रश्न सुटणार आहे असे सांगणाऱ्या मंत्री केसरकर यांनी उपजिल्हा रुग्णांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मल्टिस्पेशालीटी हाॅस्पीटलचे गाजर अजून किती काळ देणार आहात. शहरात सुरु करण्यात आलेला बाळासाहेब ठाकरे दवाखाना उघडून लोकांना आरोग्य सेवा द्या नंतर मोठ मोठ्या हॉस्पिटलच्या गजाली सांगा असेही राऊळ म्हणाले.शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यात शिक्षकच नाहीत जिल्ह्यातील शिक्षण मंत्री असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२८ शून्य शिक्षकी बनल्या आहेत. शिक्षकांच्या ११३० जागा रिकाम्या आहेत. तरीही ४०० शिक्षक तात्काळ हवे होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याला जबाबदार कोण असा सवाल ही यावेळी राऊळ यांनी केला आहे.
भाषा मंत्री असल्याने सावंतवाडीत येऊन गजाली सांगून जातात, रूपेश राऊळांचे टीकास्त्र
By अनंत खं.जाधव | Updated: June 27, 2023 16:14 IST