एक खिडकी योजना राबवा
By Admin | Updated: November 14, 2014 23:19 IST2014-11-14T22:46:07+5:302014-11-14T23:19:37+5:30
बाबा मोंडकर यांची मागणी : अनधिकृत गाईडबाबत लक्ष वेधले

एक खिडकी योजना राबवा
मालवण : मालवणच्या पर्यटन व्यवसायात विशेषत: स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग या व्यवसायात अनधिकृत गाईड्स व एजंटचा धुमाकूळ वाढला असल्याने यामुळे वॉटर स्पोटर््स व्यावसायिक व त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांना नाहक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच तालुक्यातील वायरी-तारकर्ली-देवबाग या रस्त्यावरून जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या अशा अनधिकृत गाईड्सकडून अडवून पर्यटकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यातून वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ही गोष्ट गंभीर असून यासाठी बंदर विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयातून या गोष्टीवर चाप ओढणे गरजेचे आहे. तसेच हे प्रकार रोखण्यासाठी संबंधित अनधिकृत गाईड्स आणि वॉटर स्पोटर््स व्यावसायिक यांना बंदर विभागाने परवाने देऊन सर्वांना एका छत्राखाली आणून एक खिडकी योजना राबवावी अशी मागणी भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मालवण बंदर विभाग व पोलीस ठाण्याकडे केली आहे.
मालवणातील पर्यटन विकास होत असतानाच विशेषत: वॉटर स्पोटर््स व्यवसायातील स्पर्धा आणि मार्केटींगमधील स्पर्धा वाढीस लागली आहे. अनधिकृत गाईड्समुळे ज्या अधिकृत वॉटर स्पोटर््स व्यावसायिकांकडून मिळणाऱ्या दर्जेदार सुविधांपासून पर्यटक वंचित राहतात. तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून येणाऱ्या पर्यटकांच्यासाठी सर्व सुविधांचे नियोजन केले जाते. त्यात वॉटर स्पोटर््स सुविधेचा समावेश आहे. दर्जेदार सुविधा पुरविण्याचा हॉटेल व्यावसायिकांचा मानस असतो. पर्यटकांकडून अॅडव्हान्स बुकींग केले जाते. मात्र, अनधिकृत गाईड्कडून कमी किंमतीत सुविधा देण्याचे आमिष दाखवून पर्यटकांना त्यांच्याकडे खेचले जाते. त्यावेळी पर्यटक अॅडव्हान्स बुकींग असतानाही हॉटेल व्यावसायिकांच्या हातावर तुरी देऊन नाहीसे होतात. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक व त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या अधिकृत वॉटर स्पोटर््स व्यावसायिक व संस्थांचेही नुकसान होते.
त्यामुळे अशा गाईड्स अधिकृतरित्या एखाद्या पर्यटन संस्थेमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांना परवाने देणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या अनधिकृत वॉटर स्पोटर््स व्यावसायिकांनाही एक खिडकी योजनेखाली आणून सर्व व्यावसायिकांना समान दर निश्चित करून देणे आवश्यक आहे. यासाठी बंदर विभाग व पोलीस यंत्रणेच्या समन्वयातून सहकार्य आवश्यक आहे, असेही मोंडकर म्हणाले.
यावेळी भाजपचे भाऊ सामंत, विलास हडकर तसेच वॉटर स्पोटर््स व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढणे आवश्यक
यासाठी वॉटर स्पोटर््स व्यावसायिक, पर्यटन संस्था, बंदर विभाग, पोलीस यंत्रणा यांची एकत्रित बैठक घेऊन याप्रश्नी तोडगा काढणे आवश्यक आहे असेही मोंडकर यांनी सांगितले. यावर पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांनी आवश्यक नियमावलीचा कच्चा मसुदा तयार करा व त्याबाबत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांची भेट घ्या असे सुचविले. तसेच यात पोलिसांचे आवश्यक सहकार्य लाभेल असेही सांगितले.