सावंतवाडीत युवकांच्या अटकेची अफवा
By Admin | Updated: August 22, 2014 01:06 IST2014-08-22T01:04:25+5:302014-08-22T01:06:51+5:30
अन्य आरोपींच्या अटकेसाठी उद्या काँग्रेसचा मोर्चा : अत्याचार प्रकरणावरून राजकीय आरोपांची धुळवड कायम

सावंतवाडीत युवकांच्या अटकेची अफवा
सावंतवाडी : युवतीच्या अत्याचार प्रकरणावरून सावंतवाडीत सध्या जोरदार अफवांचे पिक पसरले आहे. गुरूवारी सकाळी शहरातून पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या बातमीने सर्वत्र एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांशी संपर्क केला असता, अशी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे सांगत पोलिसांनी अफवेचे खंडन केले आहे. तर बुधवारी सावंतवाडीत उडालेला राजकीय धुरळा गुरूवारीही कायम होता.
काँग्रेसने या प्रकरणातील महत्त्वाचे आरोपी उघड माथ्याने फिरत आहेत. त्यांच्या अटकेसाठी शनिवार, २३ आॅगस्ट रोजी धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर शिवसेनेने आमच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस धमकी देत असल्याचा आरोप केला आहे. मनसेने या प्रकारात स्थानिक पोलिसांना जबाबदार धरले आहे.
मात्र, या प्रकरणात सावंतवाडीतील आणखी काही युवकांचा सहभाग असल्याचे अनेक प्रत्यदर्शींनी पाहिल्याने हे प्रकरण या सहाजणांपुरते मर्यादीत न राहता उर्वरित आरोपींवरही कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व थरातून होत आहे.
दरम्यान, मंगळवारी सहा आरोपींना अटक केल्यानंतर अद्यापपर्यंत कोणालाही पोलिसांनी अटक केली नाही. पण आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली, अशी अफवा गेले दोन दिवस शहरात पसरवण्यात येत आहे. गुरूवारी तर राजवाड्यानजीक एका बारमधून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात बड्या धेंड्याचे मुलगे आहेत, असे सांगण्यात आले. मात्र, सावंतवाडी पोलीस तसेच ओरोस पोलीस यांच्याशी याबाबत संपर्क केला असता, असे कोणतेही आरोपी पकडण्यात आले नाही, असे सांगण्यात आले तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती ही पोलिसांनी केली आहे.
ही कारवाई स्थानिक पोलिसांनी केली नाही तर ती ओरोस येथील पोलिसांनी केली असल्याचे हे राजकीय पक्ष सांगत आहेत. तसेच आपल्याकडील काही प्रकरणे लवकरच पोलिसांजवळ देणार असल्याचे काहींनी सांगितले.
सावंतवाडी शहरातील अल्पवयीन मुलीचा प्रकार पुढे आल्यानंतर असे अनेक प्रकार दिवसा ढवळ्या घडत असल्याचे पुढे येत आहे. यात सावंतवाडी शहरातील काही युवक नेहमी किमती मोबाईल तसेच आलिशान गाड्यांचा वापर करीत काही कॉलेज तरूणींना भुरळ घालतात आणि त्यांना फिरायला नेतात, अशा तक्रारी पोलिसांकडे प्राप्त आहेत. पण पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशामुळे हे प्रकार वाढीस लागत असून, आता तरी पोलिसांनी जागे व्हावे, अशी अपेक्षा शहरातील नागरिक करत आहेत.
गुरूवारी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत एका महिला पदाधिकाऱ्याच्या मुलावर थेट आरोप केला आहे. हा मुलगा संबंधित मुलीच्या घरी रात्रीचा काय करीत होता. अनेकवेळा त्याचे आई व वडिल त्याला घरी घेऊन गेले आहेत. मग एवढा सभ्यतेचा आव आणून मुलाला वाचवण्यासाठी काही महिला पदाधिकारी या अंकुर महिला निवारण केंद्राच्या फेऱ्या का मारत आहेत, असा सवाल काँग्रेस उपस्थित करत आहे.
तसेच या मुलाव्यतिरिक्त आणखी काही युवक असूून, हे युवक सध्या खुलेआम फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही, याप्रकरणातील आरोपींची यादी मोठी आहे. यातील सर्वांची नावे पोलिसांकडे देणार असल्याचेही काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले आहे. याच्या तपासाची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)