सत्ताधाऱ्यांनी राज्यावर नांगर फिरविला : राज
By Admin | Updated: October 12, 2014 01:04 IST2014-10-12T01:04:02+5:302014-10-12T01:04:14+5:30
सावंतवाडीत घणाघात : प्रचारसभेत चारही पक्षांना केले टार्गेट

सत्ताधाऱ्यांनी राज्यावर नांगर फिरविला : राज
सावंतवाडी : राज्यातील चारही प्रमुख पक्षांची अवस्था दयनीय आहे. त्यांनी जनतेला गृहीत धरले आहे. नीतीमत्ता नावाची गोष्ट नाही, राज्यकर्ते नालायक आहेत, त्यापुढे जाऊन विरोधी पक्षही नालायक आहे. राज्यातील स्थिती भयावह आहे, एकीकडे राज्यात ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दुष्काळ वाढत चाललाय. सत्ताधाऱ्यांनी तर महाराष्ट्रावर नांगर फिरविला, अशा ठाकरी शैलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, शनिवारी चौफेर टीकेची झोड उठविली. ते सावंतवाडी येथे प्रचारसभेत बोलत होते.
राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, शनिवारी येथील जिमखाना मैदानावर झाली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही सभा होत असल्याने मैदान गर्दीने तुफान भरून गेले होते. यावेळी व्यासपीठावर मनसे नेते शिरीष पारकर, मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर, अनिल शिदोरे, कोल्हापूरचे उमेदवार सुरेश साळोखे, जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले, धीरज परब, चैताली भेंडे, भारती रावराणे, आदी उपस्थित होते.
भाजपकडे नीतीमत्ता नाही
यावेळी ठाकरे म्हणाले, भाजपकडे नीतिमत्ता राहिली नाही. त्यांचे पंतप्रधान येऊन महाराष्ट्रात मते मागत आहेत. ही मते कोणासाठी मागतात? काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आलेल्या ६० जणांसाठी मागत आहेत का? ज्या पक्षाने विधानसभेत बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांच्यावर टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान फिरत आहेत, यावरूनच भाजपची नीतीमत्ता कळते.
आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. अनेक बाबतीत महाराष्ट्राला मागे नेऊन ठेवले आहे. राज्याचा विकास पर्यटनमधून होऊ शकतो. प्रचंड ताकद पर्यटनमध्ये असताना यांच्याकडे साधा आराखडाही नाही. राज्याला पर्यटनातून दहा ते बारा हजार कोटी आणि दहा ते बारा हजार युवकांना काम मिळवून देईल, असा आराखडा तयार आहे.
हापूस आंबा भय्या विकतो
कोकण आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आंबा प्रकिया उद्योग दिसत नाही.
सभा तीन तास उशिरा सुरू
मनसेची सभा सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज ठाकरे हे तीन तास उशिरा आल्याने ही सभा दुपारी १ वाजता सुरू झाली. तरीही भर उन्हात गर्दी तशीच टिकून होती.
राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करीत असताना भाजप उमेदवार राजन तेली यांचे नाव न घेता टीका केली. पहिले जनता दल, नंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि त्यानंतर अचानक भाजप असे पक्षांतर त्यांनी केले आहे. काँग्रेस सोडल्यानंतर अवघे सात दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले. त्यांना तो पक्ष सहा रात्री आणि सात दिवसांचा हनिमून पॅकेज वाटला काय? अशी टीका ठाकरे यांनी केली.