सावंतवाडी : सावंतवाडी येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेअर्स मार्केटमधील पैशाचा वेळेत परतावा न मिळाल्याने तुफान राडा झाला असून, यावरून पोलिसांकडून ११ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अपहरण, अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच घरफोडी अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, हा सर्व प्रकार साडेचार कोटींच्या व्यवहारातून घडला आहे. यात पुणे येथील पाच तर सिंधुदुर्ग येथील सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ९ जणांना अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अन्य दोघांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.सावंतवाडी शहरातील सागर कारिवडेकर या तरुणाने शेअर्स मार्केटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांचे पैसे देणे काही कारणाने थांबले होते. तसेच त्याच्याकडे स्रोत उत्पन्नापेक्षा जादा रक्कम खात्यावर आढळून आली होती. त्यामुळे खात्यांतील व्यवहार थांबवून ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. पण गुंतवणूकदारांना वेळेत दिलेल्या रकमेचा परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदारांकडून त्याच्या मागे तगादा लावण्यात आला होता.
कारिवडेकर यांच्याकडून पुणे येथील काही गुंतवणूकदारांचे तब्बल चार ते साडेचार कोटी रुपये देणे आहे. पण सध्या हे पैसे देता येणार नाहीत; तुम्हाला माझी आलिशान कार देतो म्हणून सांगितले होते. त्यासाठी पुणे येथील पाचजण शनिवारी दुपारीच सावंतवाडीत दाखल झाले होते. यावेळी कारिवडेकर हे घरी नव्हते. त्यांचा सुपरवायझर वामन ऊर्फ नितीन मेस्त्री याच्याकडे कारबाबत विचारणा केली. पण त्याने योग्य उत्तर दिले नाही.
तसेच कारही दिली नसल्याने अखेर मेस्त्री यांनाच पुण्यातील पाच जणांनी गाडीत घालून आरोस न्हावेली येथे घेऊन गेले. मारहाण केली तसेच कारिवडेकर यांच्या बंद सदनिकेत अनधिकृत प्रवेश करत घराच्या दरवाजाची कडी कटावणीने उघडल्याप्रकरणी तसेच सर्वोदयनगर येथील घराच्या काच दगडाने फोडल्याप्रकरणी पुणे येथील शंभूराजे देवकाते, शौनक सकपाळ, बॉबी काकडे, अतुल धिवरे, श्रीकांत कांबळे (सर्व रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे येथील संशयित आरोपींनी दिलेल्या तक्रारीत शनिवारी रात्रीच्या सुमारास तहा राजगुरू याने शौनक सपकाळ व अशोक ऊर्फ बाबू काकडे यांना जिवे ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घालून दुखापती केल्या. तसेच इतरांनी मिळून शौनक सकपाळ, बॉबी काकडे, अतुल धिवरे, श्रीकांत कांबळे यांना मारहाण केली म्हणून वामन ऊर्फ नितीन मेस्त्री, तहा राजगुरू, अब्दुल खान, तेयशील दरवाजकर (सर्व रा. सावंतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यात वापरलेल्या कार ही जप्त करण्यात आल्या आहेत.दरम्यान, हा सर्व प्रकार सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर येथील कारिवडेकर याच्या बंगल्यात व बंगल्यासमोर घडला. पोलिसांकडून या ठिकाणी जात फॉरेन्सिक टीमद्वारे सर्व माहिती गोळा करण्यात आली आहे.
नऊ जणांवर गुन्हे, पोलीस कोठडीदरम्यान, या घटनेनंतर रविवारी सकाळी नऊ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना सायंकाळी उशिरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे करीत आहेत.
Web Summary : A dispute over delayed share market returns in Sawantwadi escalated into violence, leading to the arrest of nine individuals. The conflict, involving a 4.5 crore rupee transaction, resulted in charges including kidnapping and attempted murder. Police are investigating the incident.
Web Summary : सावंतवाड़ी में शेयर बाजार रिटर्न में देरी को लेकर विवाद बढ़ गया और हिंसा में बदल गया, जिसके परिणामस्वरूप नौ लोगों को गिरफ्तार किया गया। 4.5 करोड़ रुपये के लेनदेन से जुड़े इस संघर्ष में अपहरण और हत्या के प्रयास जैसे आरोप शामिल हैं। पुलिस मामले की जांच कर रही है।