आचिर्णे येथे ‘रॉकेट’ची चाचणी

By Admin | Updated: September 30, 2014 00:23 IST2014-09-30T00:22:00+5:302014-09-30T00:23:17+5:30

किरण नाईक : अवकाशात न उडविता जमिनीत पुरून क्षमता तपासली

'Rocket' test at Acharya | आचिर्णे येथे ‘रॉकेट’ची चाचणी

आचिर्णे येथे ‘रॉकेट’ची चाचणी

वैभववाडी : साखरेच्या इंधनावर अवकाशात १० किलोमीटरचा टप्पा गाठू शकण्याची क्षमता असलेल्या ज्ञानज्योती सिव्हीलियन रॉकेटची यशस्वी चाचणी आचिर्णेच्या माळरानावर रविवारी घेण्यात आली. रॉकेट अवकाशात न उडविता जमिनीत पुरून त्याची क्षमता तपासण्यात आली, अशी माहिती इंटरनॅशनल इंडियन युनिर्व्हसिटी (आयआययु)चे कुलगुरू किरण नाईक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
आचिर्णेच्या माळरानावर ११ आॅगस्ट रोजी ४.५ किलोमीटर क्षमतेच्या सिव्हीलियन रॉकेटची चाचणी तांत्रिक दोषामुळे अयशस्वी ठरली होती. त्याचवेळी कुलगुरू किरण नाईक यांनी याच ठिकाणी अल्पावधीतच चाचणी यशस्वी करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार शनिवार व रविवार हे दोन दिवस नाईक यांच्यासह आयआययुच्या शास्त्रज्ञांचे पथक ही मोहीम यशस्वी करण्यात गुंतले होते. कुलगुरू नाईक म्हणाले, मागचा अनुभव लक्षात घेता अधिक काळजीपूर्वक रॉकेट बनविण्यात आले होते. १० किलोमीटरचा टप्पा गाठू शकणाऱ्या ज्ञानज्योती रॉकेटची चाचणी घेण्यापूर्वी २.५ किलोमीटर क्षमतेच्या ज्ञानांजली या रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली. त्यानंतर वातावरण आणि जागेच्या उपलब्धतेचा विचार करून जमिनीमध्ये पुरून १० किलोमीटरचा टप्पा गाठू शकणाऱ्या ज्ञानज्योती रॉकेटची चाचणी घेऊन त्याची क्षमता तपासण्यात आली. त्यानुसार ज्ञानज्योती हे रॉकेट ४.५ किलोमीटर ते १० किलोमीटरच्या टप्प्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर अतिवृष्टी, गारपीट टाळणे, खनिज संपत्ती शोधणे, कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत सिव्हीलियन रॉकेट तंत्रज्ञानाचे संशोधक राजेश मुनेश्वर आयआययुच्या वेदीक सायन्स विभागाचे प्रमुख व आचिर्णेचे सुपूत्र प्रसाद राणे उपस्थित होते. चाचणीबाबत प्रचंड गुप्तता पाळली गेली होती. मात्र सांगुळवाडी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांना रॉकेट तंत्रज्ञानाची माहिती शास्त्रज्ञांनी
दिली. (प्रतिनिधी)
लक्ष्य १०० किलोमीटरचे
सिव्हिलियन रॉकेटच्या १० किलोमीटर टप्प्याची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आता १०० किलोमीटर टप्प्याच्या रॉकेट चाचणीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. इंधन म्हणून साखरेचा वापर करून केरळ येथील तुंबाया डिफेन्सच्या जागेत १०० किलोमीटर अंतर गाठणाऱ्या रॉकेटची चाचणी घेण्यात येईल, असे आयआययुचे कुलगुरू किरण नाईक यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Rocket' test at Acharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.