सावंतवाडीतील रस्ता खचला
By Admin | Updated: July 27, 2014 00:38 IST2014-07-27T00:37:49+5:302014-07-27T00:38:01+5:30
पावसाचा दणका : पांझरवाडा येथील घटना

सावंतवाडीतील रस्ता खचला
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील पांझरवाडा भागात गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता खचला आहे. या रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ता खचण्याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्याखालून पाण्याचा ओढा जात असल्याचे सांगितले जाते. याबाबत माहिती अशी की, शहरातील उभाबाजार ते पांझरवाडा असा रस्ता आहे. हा रस्ता माठेवाडा भागात बाहेर पडतो त्यामुळे या रस्त्यावरून कार तसेच दुचाकी अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते तसेच नागरिकांची ये-जा ही सुरू असते. अशातच या रस्त्यावरील भागातून पुलाचे पाणी जाते, त्या ठिकाणचा रस्ता खचला आहे. या रस्त्याचा एक भाग तर पूर्णत: कोसळला असून, रस्त्याच्या मध्यभागी तर पूल खाली गेला आहे. जोरदार पाऊस झाल्यास हा रस्ता पूर्ण कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, या रस्त्यावरून चुकीच्या पध्दतीने डंपर घालण्यात आला होता. त्यामुळे हा रस्ता खचला असून, येत्या दोन दिवसात या रस्त्याला बॅरिकेटस लावून रस्ता पूर्वतत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, तशी सूचना पालिकेचे बांधकाम अभियंता तानाजी पालव यांना दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)