रस्ता दुरुस्ती निधीत घोळ

By Admin | Updated: November 19, 2014 22:11 IST2014-11-19T22:11:08+5:302014-11-19T22:11:08+5:30

कुडाळातील प्रकार : संजय भोगटे यांचा आरोप

Road repairs funded | रस्ता दुरुस्ती निधीत घोळ

रस्ता दुरुस्ती निधीत घोळ

कुडाळ : गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या सुमारे ३० लाखाच्या निधीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता व कुडाळच्या तत्कालीन अभियंता यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास लवकरच आयुक्त व राज्यपाल यांच्याजवळ तक्रार करणार असल्याची माहिती कुडाळचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भोगटे म्हणाले, सन २०११ ते २०१३ या कालावधीत कुडाळ तालुक्यात अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला. यामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, कडेला रिफ्लेक्टर, खड्डे बुजविणे, दिशादर्शक तसेच गावाच्या नावांचे फलक लावणे अशा प्रकारच्या कामांचा यात समावेश होता. हे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकामच्या विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्यामार्फतच ही कामे के ली गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गेल्या तीन वर्षातील कामांसंदर्भात आपण माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती.
यामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली, यामध्ये तालुक्यातील सात रस्त्यांची कामे ३० लाखाचा निधी खर्च केला असल्याची माहिती दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्या सात रस्त्यांची कामे पूर्णच झाली नाहीत. यापैकी सन २०११-१२ मध्ये कुडाळ येथील लक्ष्मीवाडी करंदीकर चाळ हा रस्ता मंजूर होता. मात्र, या रस्त्याच्या निधीचा खर्च दाखविण्यात आला. परंतु अद्याप तो रस्ता पूर्णत्वास गेला नाही.
मठ-पणदूर घोटगे रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवायचे होते. तेही बसविण्यात आलेले नाहीत. याप्रकारे अन्य काही रस्त्यांवर रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, गावांच्या नावांचे फलक, खड्डे बुजविणे आदी कामे केली गेली नाहीत. मात्र, निधी खर्च दाखविला गेला, अशी माहिती भोगटे यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्यांच्या कामात सुमारे ३० लाखाचा भ्रष्टाचार केला असल्याचे भोगटे यांनी सांगितले. याला सर्वस्वी जबाबदार असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता व कुडाळच्या तत्कालीन अभियंता अनामिका जाधव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांना ३ मार्च रोजी दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवलीचे कार्यकारी अभियंता यांना यासंदर्भात चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. मात्र, या पत्राला आठ महिने उलटूनही कणकवली कार्यकारी अभियंता किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात कोणतीच कारवाई केलेली नाही, असेही संजय भोगटे यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)


आयुक्त, राज्यपालांकडे तक्रार करणार
कुडाळ तालुक्यातील रस्ता दुरस्ती कामातील भ्रष्टाचारासंदर्भात कार्यकारी अभियंता व तत्कालीन अभियंता अनामिका जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हे जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल न केल्यास यासंदर्भात आयुक्त व राज्यपाल यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा संजय भोगटे यांनी दिला
आहे.


अण्णाभाऊ साठे साहित्य
संमेलन सावंतवाडीत
१७, १८ जानेवारीला आयोजन
सावंतवाडी : अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन १७ व १८ जानेवारीला सावंवाडीत घेण्याचे निश्चित झाले आहे. नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात होणाऱ्या या संमेलनाच्या संयोजन समिती अध्यक्षपदी प्रा. प्रवीण बांदेकर, तर स्वागताध्यक्षपदी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची निवड करण्यात आली. साहित्य संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. गोविंदराव पानसरे यांच्या उपस्थितीत श्रीराम वाचन मंदिरात झालेल्या बैठकीत संमेलनाची रुपरेषा ठरविली.
अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलने आजवर, कोल्हापूर, अहमदनगर, नांदेड, नागपूर व नाशिक येथे झाली आहेत. सावंतवाडीत प्रथमच होणारे हे सहावे संमेलन आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समिती, भोजन समिती, स्वागत समिती, स्मरणिका समिती अशा समित्या स्थापन करण्यात आल्या असून आर्थिक बाजू सांभाळण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
राज्यात ५० वर्षांपूर्वी साहित्यात एकसुरी प्रवास होता. कालांतराने अनेक लोक लिहू लागले. अनेक प्रकारचे साहित्य येऊ लागल्याने नवे प्रवाह निर्माण झाले. त्या प्रवाहांपैकीच एक अण्णाभाऊ साठेंचे साहित्य आहे, असे मत अ‍ॅड. पानसरे यांनी यावेळी व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य सर्वदूर पोहोचविणे आवश्यक होते. अण्णाभाऊंनी स्वानुभवातून साहित्य लेखन केले. त्यामुळे त्यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आणि नवीन लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी साहित्य संमेलनाचे प्रायोजन आहे.
यावेळी प्रा. प्रवीण बांदेकर, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, नागेश हजेरी, प्रा. आनंद मेणसे, आनंद अंधारी, हरिहर आठलेकर, उमा पानसरे, वीरधवल परब, सुनिता अमृतसागर, प्रभाकर भागवत आदी उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Road repairs funded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.