सिंधुदुर्गात मुसळधार !
By Admin | Updated: October 26, 2014 00:08 IST2014-10-26T00:08:42+5:302014-10-26T00:08:56+5:30
भातशेतीचे नुकसान : पावशीत दोन घरे पडून सव्वा लाखाची हानी

सिंधुदुर्गात मुसळधार !
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात काल, शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कुडाळ-पावशी येथील दोन घरांची पडझड होऊन सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले, तर कापणीला आलेल्या भातशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीला जोर आला असून, काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी भातशेतीची कापणी करून वाळत ठेवलेले भात वाहून गेले, तर कापणीला आलेली भातशेती जमीनदोस्त झाली आहे. वाफ्यामध्ये पाणी साचून राहिल्याने भातशेती कुजण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २७.०२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे., तर आतापर्यंत एकूण सरासरी २९९२.०५ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. गतवर्षीची सरासरी पावसाने गाठली नसली तरी पावसाबरोबरच वादळी वारा येत असल्याने घरांचे व भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे कुडाळ तालुक्यातील पावशी येथील सुमित्रा भिकाजी कदम यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे सुमारे ७८ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले, तर पावशी ढवणवाडी येथील उत्तम रामचंद्र चव्हाण यांचे वादळी वाऱ्यामुळे घराचे छप्पर कोसळल्याने सुमारे २३ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे, तसेच अन्य ठिकाणी घरांची, गोठ्यांची पडझड होऊन नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, याबाबतची उशिरापर्यंत नोंद झालेली नाही. जिल्ह्यात भात कापणीला जोर आला आहे. मात्र, भरदुपारी पावसाचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडत आहे. भात कापणीचे कामही लांबणीवर पडले आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता.
जिल्ह्यात ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस.
आतापर्यंत पडलेला एकूण सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे - दोडामार्ग १५ (३५८४), सावंतवाडी ४८ (३४५९), वेंगुर्ला ४४.६० (२५२०.४०), कुडाळ १९ (३२८३), मालवण ४१ (२७५४), कणकवली २९ (३१००), देवगड १५ (२२७६), वैभववाडी ६ (२९६०) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.