मालवण किनारपट्टीला उधाणाचा फटका

By Admin | Updated: July 16, 2014 23:20 IST2014-07-16T23:20:04+5:302014-07-16T23:20:19+5:30

हजारोंची उपकरणे जळाली : दोडामार्गात पर्यटकांना वाचविले

Rising downhill on Malvan coastline | मालवण किनारपट्टीला उधाणाचा फटका

मालवण किनारपट्टीला उधाणाचा फटका

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मालवण किनारपट्टीवर उधाणाने मोठे नुकसान केले. लाटांच्या माऱ्यामुळे दांडी चौकचार मंदिराजवळील संरक्षक भिंत उखडली गेली, तर किनारपट्टीवरील माडाची झाडे कोसळली. वीजवाहिन्या तुटून शॉर्टसर्किट होऊन अनेकांच्या घरांतील विद्युत उपकरणे जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले. दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबरच्या कॉजवेवरून मांगेलीत वाहून जाणाऱ्या दोन पर्यटकांना वाचविले.
जिल्ह्यात पावसाची संततधार चालूच आहे. त्यामुळे नुकसानीचे सत्रही सुरूच आहे. पावसामुळे ठिकठिकाणी सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यातील हिंदळे येथील दत्ताराम यशवंत तेली यांच्या घराची अंशत: पडझड होऊन दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. मिठबांव येथील ललिता सोमाजी लोके यांच्या घराचे नऊ हजार २२५ रुपयांचे, तर किंजवडे येथील अंकुश बाबूराव परब यांच्या घराचे दोन हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गनगरीतील शासकीय विश्रामगृह व पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्यासमोर, तर महामार्गावर हुमरमळा, पणदूर व पावशी या ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने येथील वाहतूक काहीकाळ ठप्प होती. कुडाळ तालुक्यातील आंबेरी येथे रिक्षावर झाड पडल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला गोवा बांबुळी येथे हलविले आहे. वेंगुर्ला येथील हॉटेल कोकण किनारा येथे विजेच्या लाईनवर झाड पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Rising downhill on Malvan coastline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.