पुन्हा हस्तलिखित सातबारा
By Admin | Updated: December 11, 2015 23:47 IST2015-12-11T23:08:24+5:302015-12-11T23:47:31+5:30
आॅनलाईनचा फज्जा : राजन साळवींच्या प्रस्तावाला महसूलमंत्र्यांची मान्यता.

पुन्हा हस्तलिखित सातबारा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील आॅनलाईन सातबारा प्रक्रियेतील उडालेल्या गोंधळातून सातबाराधारकांना आमदार राजन साळवी यांनी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून सुसह्यता मिळवून दिली आहे. पुन्हा लवकरच हस्तलिखित सातबारा उपलब्ध होणार आहेत.राज्यातील सातबाराधारक शेतकरी, गरीब, अशिक्षित सर्वसामान्य मंडळींना संगणकप्रणालींचे सातबारे तत्काळ उपलब्ध व्हावे, यासाठी आॅनलाईन सातबारा हा कार्यक्रम राबविणेत येत आहे. परंतु, कित्येक सातबारा हे अत्यंत जुन्या कालावधीतील असल्याने जीर्ण नोंदवहीतील नोंदी,अपुरा कर्मचारीवर्ग, सातत्याने सातबारा नोंदीत होणारे बदल यामुळे आॅनलाईन सातबारा कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे. सदरील आॅनलाईन सातबारा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने हस्तलिखित सातबारा वितरीत करणेवर निर्बंध आले. या शासन आदेशाची अंमलबजावणी तहसीलदार,मंडल अधिकारी व तलाठी आदींकडून केली जात आहे. परिणामी अशिक्षित गरीब शेतकरी, सर्वसामान्य मंडळी यांची मोठया प्रमाणावर कुचंबणा होत असून, सातबारा उपलब्ध होत नसलेने याच्याशी संबंधीत सर्व कामे ठप्प झाली आहेत. सर्वसामान्य जनतेला शासनाच्या या उपक्रमामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी महसूल मंत्री नामदार एकनाथ खडसे यांची नागपूर येथे चालू अधिवेशनादरम्यान भेट घेतली. याबाबत आमदार साळवी यांनी या आॅनलाईन सातबारा प्रक्रियेमुळे उद्भवलेली समस्या ध्यानी आणून दिली. तसेच आॅनलाईन सातबारा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हस्तलिखित सातबारे वितरीत करणेत यावेत, अशी मागणी केली. महसूलमंत्री खडसे यांनीही आमदार साळवी यांच्या निवेदनावर तत्काळ कार्यवाही करत जिल्हा प्रशासनाला याबाबतचे आदेश लिखित स्वरुपात तातडीने पाठविले केले. समाजातील अशिक्षित,गरीब तसेच शेतकरी आदी घटकांसाठी मांडलेल्या प्रस्तावाला खडसे यांनी तत्काळ अनुकूलता दर्शविल्याने आता हस्तलिखित सातबारा उपलब्ध होणार आहेत. (प्रतिनिधी)
अडचण : सातबारा उतारा अद्ययावत नाही
शासनाने आॅनलाईन सातबारा उतारा देण्याची मोहीम हाती आखली होती. त्यानंतर त्याचे काम सुरूही झाले. मात्र, आॅनलाईन मिळणारे सातबारा उतारा अद्ययावत नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे नागरिकांना जुना सातबारा उतारा मिळत असल्याने अडचण निर्माण होत आहे.
तलाठ्यांकडून अपूर्ण काम
आॅनलाईन सातबारा संगणकीकृत करण्याचे काम शासनाने तलाठ्यांकडे दिले होते. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागातील सातबारा अपडेट झालेले नाहीत.
अधिवेशनादरम्याने आमदार राजन साळवींनी मांडली व्यथा.
सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबना.
जिल्हा प्रशासनाला तत्काळ आदेश पाठविणार.
शेतकऱ्यांमध्ये समाधान.