सेवानिवृत्त पदवीधर शिक्षकांचे धरणे आंदोलन मागे
By Admin | Updated: November 18, 2014 23:26 IST2014-11-18T22:07:58+5:302014-11-18T23:26:33+5:30
निवडश्रेणीबाबत लेखी आश्वासन : गुरूनाथ पेडणेकर, स्नेहलता चोरगे यांची मध्यस्थी

सेवानिवृत्त पदवीधर शिक्षकांचे धरणे आंदोलन मागे
कणकवली : सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर सेवानिवृत्त पदवीधर श्रेणीधारक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व इतर शिक्षकांच्यावतीने सोमवारी प्रातिनिधीक स्वरूपात धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर व उपशिक्षणाधिकारी गोसावी यांनी निवडश्रेणीबाबतचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना ४ एप्रिल १९९० च्या शासन निर्णयानुसार त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू केली आहे. या त्रिस्तरीय वेतनश्रेणीतील निवडश्रेणी देण्याबाबतची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागस्तरावर चुकीच्या पद्धतीने सुरु होती. त्यामुळे पदवीधर श्रेणीधारक शिक्षक २००४ साली निवडश्रेणीसाठी पात्र होऊनही त्यांना गेल्या दहा वर्षात निवडश्रेणीचा लाभ मिळालेला नाही. यासाठी पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना तसेच संबंधित शिक्षकांनी वारंवार अर्ज विनंत्या करूनही प्राथमिक शिक्षण विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.
राज्य शासनाच्या १४ नोव्हेंबर १९७९ च्या निर्णयान्वये प्राथमिक शिक्षण विभागाकडे पदवीधर श्रेणीधारक शिक्षकांची पदे निर्माण करण्यात येवून ती पदे १९८० पासून प्रत्यक्ष कार्यरत झाली. परिणामी १९८० साली कार्यरत असणारे पदवीधर शिक्षक १२ वर्षानंतर म्हणजेच १९९२ साली वरिष्ठ श्रेणीसाठी पात्र ठरले व त्याप्रमाणे त्यांना ती श्रेणी मिळाली. मात्र १२ वर्षांनी म्हणजे २००४ साली निवड श्रेणींच्या अटींची पूर्तता केलेले २० टक्के पात्र पदवीधर शिक्षक निवडश्रेणीसाठी पात्र ठरले. त्यामुळे २००४ सालापासून वरिष्ठ श्रेणीधारक पदवीधर शिक्षकांपैकी २० टक्के पदवीधर प्राथमिक शिक्षकांना क्रमाक्रमाने निवडश्रेणी मिळणे आवश्यक होते. परंतु जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे वारंवार निवेदने देऊनसुद्धा पदवीधर श्रेणीधारक शिक्षकांची निवडश्रेणीसाठी स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी तयार केलेली नव्हती. त्यामुळे एकाही पदवीधर शिक्षकाला निवडश्रेणीचा लाभ न मिळाल्याने आर्थिक नुकसान होत आहे.
आंदोलनाच्यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर तसेच अन्य अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी पदवीधर शिक्षकांच्यावतीने नरहरी रासम, सुरेश पेडणेकर, मधुकर राणे, राजाराम चिपळूणकर, कैवल्य पवार, अरुण साळगावकर, चंद्रकांत तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेनंतर लेखी आश्वासन देण्यात आल्याने धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. (वार्ताहर)