जशास तसे उत्तर देणार
By Admin | Updated: December 1, 2014 00:17 IST2014-11-30T21:42:35+5:302014-12-01T00:17:47+5:30
पारंपरिक मच्छिमारांनी प्रतिआव्हान दिले

जशास तसे उत्तर देणार
मालवण : निवती येथील मिनी पर्ससीननेटधारक संघर्ष समितीच्या आव्हानाला पारंपरिक मच्छिमारांनी प्रतिआव्हान दिले आहे. आम्ही जिल्ह्यातील तीनही तालुक्यातील पारंपरिक मच्छिमार शाम सारंग यांच्या आव्हानाला साम, दाम, दंड, भेद या नितीचा अवलंब करून जशास तसे उत्तर देण्यास कधीही तयार आहेत. एवढेच नव्हे तर तुमच्या बंदरात येवूनही आम्ही मासेमारी करून दाखवू. अंगात हिंमत असेल तर आम्हाला अडवून दाखवा, असे प्रतिआव्हान येथील पारंपरिक मच्छिमारांनी दिले आहे.
निवती येथील मिनी पर्ससीननेट धारकांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर या संदर्भात निर्णय घेण्यासाठी रविवारी सायंकाळी उशिरा दांडी येथील चौकचार मंदिर येथे पारंपरिक मच्छिमारांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, तालुका श्रमिक रापण संघटनेचे अध्यक्ष छोटू सावजी, सन्मेश परब, कल्पेश रोगे, बाबू लोणे, आप्पा लोणे, राजू परब, बाबू आचरेकर, बाबू जोशी, महेश कोयंडे, रमाकांत धुरी, दत्ताराम जाधव, नारायण आडकर आदी उपस्थित होते.
यावेळी दिलीप घारे म्हणाले, शून्य ते दहा फॅदमपर्यंत पारंपरिक मच्छिमार कोणत्याही किनाऱ्यावर जावून मासेमारी करू शकतो. त्यांना शासनाची परवानगी आहे. आम्हाला विजयदुर्गपासून केरवाड्यापर्यंत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करण्यास शासनाचे संरक्षण आहे. बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांनी आम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. मिनी पर्ससीनधारक जर पारंपरिक मच्छिमारांच्या तोंडचा घास हिरावून नेत असतील तर साम, दाम, दंड, भेद या नितीचा अवलंब करून तुम्हांला उत्तर देऊ. समाजबांधवांनाही न जुमानता आम्ही संघर्ष करू. हे शाम सारंग यांनी लक्षात ठेवावे.
सोमवारी ४ ते ६ या वेळात आम्ही निवती व कोचरा बंदरासमोर येवून मासेमारी करून दाखवितो. अंगात हिंमत असेल तर आमची मासेमारी रोखून दाखवा.
शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून तुम्ही आमच्यासोबत संघर्ष केल्यास आम्हीसुद्धा संघर्षास तयार आहोत. मिनी पर्ससीननेटवाले गेली कित्येक वर्षे कुणकेश्वरपर्यंत जावून बेकायदेशीर मासेमारी करीत होते. त्यावेळी शासनाच्या अटी शर्थी दिसल्या नाही काय? शाम सारंग यांनी अज्ञान प्रकट करू नये असेही घारे म्हणाले. (प्रतिनिधी)